एक्स्प्लोर
काँग्रेस लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेणार
2014च्या निवडणुकीचा अनुभव काँग्रेसच्या पाठीशी आहे. तर निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी राफेल प्रकरणी मोदींची केलेली पाठराखण काँग्रेसला विचार करायला भाग पाडत आहे.

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपचा विजयाचा वारु रोखण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने महाआघाडीचे प्रयत्न सुरु केले आहेत. मात्र, या प्रयत्नांबाबत शंका उपस्थित होत आहे. कारण, एकीकडे चर्चेचे आखाडे रंगत असताना काँग्रेस लोकसभेच्या 48 जागांचा आढावा घेणार असल्याचं समजतं. 2014 विधान सभा निवडणूक..भाजप आणि शिवसेनेच्या युतीच्या बैठका सुरु होत्या तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडीबाबत चित्र स्पष्ट करत नव्हते. भाजपने युती करणार नाही हे स्पष्ट केल्यानंतर अवघ्या एक तासात राष्ट्रवादीने पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारचा पाठिंबा काढला. राज्यपालांना जाऊन पत्र दिले. त्यामुळे पृथ्वीराज चव्हाण यांना राजीनामा द्यावा लागला आणि 2014 विधान सभा निवडणूक काँग्रेस आणि राष्ट्रवादीने वेगळी लढवली. हा अनुभव काँग्रेसच्या पाठीशी आहे. तर 2019 लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवारांनी राफेल प्रकरणी मोदींची केलेली पाठराखण काँग्रेसला विचार करायला भाग पाडत आहे. त्यामुळे राष्ट्रवादीपासून पोळलेली काँग्रेस आता ताकही फुंकून पिताना दिसत आहे. राज्यात या दोन्ही पक्षांची ताकद पाहता लोकसभा 2014 काँग्रेस - 2 राष्ट्रवादी - 5 विधानसभा 2014 काँग्रेस - 42 राष्ट्रवादी – 41 स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये काँग्रेसपेक्षा राष्ट्रवादीचं पारडं जड आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने काँग्रेससमोर आघाडीसाठी 50-50 चा फॉर्म्युला दिला आहे. इतकंच नाही तर काँग्रेसच्या पुणे, यवतमाळ, औरंगाबाद अशा जागांवरही राष्ट्रवादीने दावा केला आहे. पण राष्ट्रवादीचा हा फॉर्म्यूला काँग्रेसला मान्य होणार का?, हा प्रश्नच आहे. उत्तरप्रदेश आणि कर्नाटक पोटनिवडणुकीत काँग्रेस आणि प्रादेशिक पक्ष एकत्र आल्याने भाजपला रोखण्यात यश आलं आहे. हाच प्रयोग राज्यात यशस्वी करण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु आहेत. भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एमआयएमला सोबत घेऊन वंचित बहुजन आघाडीची स्थापना केली. काँग्रेसच्या महाआघाडीच्या प्रयत्नांना पहिला सुरुंग तिथेच लागला. त्यानंतरही प्रकाश आंबेडकरांना सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरुच आहेत. मात्र, आंबेडकरांना राष्ट्रवादी नकोय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस मनसेने आघाडीत येण्याचा प्रस्ताव देते. पण विचारधारा वेगळी असल्याने काँग्रेसचा मनसेला विरोध आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपला रोखायचं असेल तर आघाडी होणं दोन्ही पक्षांसाठी गरजेचं आहे. मात्र, कोण किती त्याग करणार यावरच आघाडीचं भवितव्य अवलंबून आहे.
आणखी वाचा























