मुंबईत काँग्रेस-भाजपमधील संघर्ष चिघळणार? आंदोलनावर काँग्रेस ठाम, तर मलबार हिलमध्ये भाजप कार्यकर्ते ताब्यात
Congress BJP in Mumbai : राज्यातील काँग्रेस आणि भाजपमधील संघर्षाचा पुढचा अंक आता मुंबईत रंगण्याची शक्यता आहे. काँग्रेसकडून देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्यावर आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.

Congress BJP protest in Mumbai : काँग्रेस विरुद्ध भाजप संघर्ष आज मुंबईत पाहायला मिळण्याची शक्यता आहे. पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याविरोधात आज विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन करण्याची घोषणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. त्याला जशास तसं उत्तर देण्याचा इशारा भाजपनं दिल्यानं संघर्ष अटळ असल्याचं दिसतं. सागर' बंगल्यावर मोर्चा नेण्याच्या निर्णयावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ठाम आहेत. आम्ही 100 ते 150 कार्यकर्त्यांसह आंदोलन करणार असल्याचे नाना पटोले यांनी सांगितले.
काँग्रेस आंदोलनापूर्वी फडणवीसांच्या बंगल्याबाहेर पोहोचलेल्या भाजप कार्यकर्त्यांची पोलिसांनी काही वेळापूर्वी धरपकड केली. नाना पटोले यांच्या बंगल्याबाहेरही सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. त्यामुळे नागपूर, पुणे, औरंगाबादमध्ये दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आल्यानंतर त्याचा पुढील अंक आज मुंबईत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर पाहायला मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसच्या आजच्या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप हेदेखील सहभागी होणार आहेत. तर, देवेंद्र फडणवीस यांच्या बंगल्याबाहेर आंदोलन करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना उलटा प्रसाद देण्याचा इशारा भाजप नेत्यांनी केला आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांना रोखण्याचं आव्हान पोलिसांसमोर आहे.
भाजपकडून वाहतूक कोंडी आणि गोंधळ; नाना पटोले यांचा आरोप
मलबार हिल परिसरात भाजप कार्यकर्त्यांकडून वाहतूक कोंडी केली जात असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला आहे. भाजपने सगळे आमदार आणि कार्यकर्त्यांना जमा केले आहे. गोंधळाची स्थिती आमच्याकडून नव्हे तर भाजपकडून निर्माण करण्यात आली असल्याचे पटोले यांनी सांगितले.
दरम्यान, मलबार हिल परिसरातील काही चौकांत जमा होणाऱ्या भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मलबार हिल परिसरात वाहतूक कोंडी
काँग्रेसने आंदोलन करणार असल्याचे जाहीर केल्यानंतर मलबार हिल परिसरात वाहतूक कोंडी झाली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कार्यकर्त्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी नाकेबंदी केली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
