स्वतःच्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाल्यामुळेच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप, भाजपचा आरोप
केवळ शेतकऱ्यांकडून दलाली घेऊन आपली दुकानदारी चालविणाऱ्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप होत आहे. अशी टीका भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
मुंबई : एकीकडे केंद्र सरकारने शेती विषयक सुधारणांकरिता 5 जून 2020 ला काढलेल्या वटहुकुमाची कठोर अंमलबजावणी महाराष्ट्रात करावी या करिता 10 ऑगस्टलाच अधिसूचना काढायची आणि दुसरीकडे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा पुळका असल्याचे दाखविण्यासाठी या विधेयकाच्या विरोधात सर्वत्र आंदोलन करायचे, यातून काँग्रेस- राष्ट्रवादीचा दुटप्पीपणा उघड झाला असून, केवळ शेतकऱ्यांकडून दलाली घेऊन आपली दुकानदारी चालविणाऱ्या कार्यकर्त्यांची दुकानदारी बंद झाली म्हणूनच काँग्रेस-राष्ट्रवादीचा संताप होत आहे. अशी टीका भाजपचे आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
ज्या कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग ( करार शेती) विषयी काँग्रेस-राष्ट्रवादीचे नेते ओरड करीत आहेत त्याच पक्षांच्या मनमोहन सिंग सरकारने 2005 मध्ये केंद्रीय राज्यमंत्र्यांची समिती नेमून अहवाल मागविला होता, त्याच अहवालाच्या आधारे 2005 मध्ये कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग व शेती मालाला खुली बाजारपेठ उपलब्ध व्हावी अशा प्रकारचे कायदे करण्याची सूचना सर्व राज्यांना दिली होती. महाराष्ट्रात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने जुलै 2006 मध्येच अशा प्रकारचा कायदा पारित करून कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग (करार शेती) व बाजार समित्यांच्या बाहेर शेतीमाल विकण्याची मुभा शेतकऱ्यांना दिली होती. त्या वेळी महाराष्ट्रासह 13 राज्यांमध्ये अशा प्रकारचा कायदा केला होता.
आता नरेंद्र मोदी यांच्या सरकारने संपूर्ण देशाकरिता तो कायदा लागू केला आहे, परंतु काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारने केलेल्या कायद्यात दलाली घेण्याची अट होती, परंतु आता मोदी सरकारने केलेल्या कायद्यात कोणत्याही प्रकारचे शुल्क किंवा दलाली देण्याची अट नसल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मक्तेदारी झालेल्या बाजारसमित्या व अडत्यांना आपली दलाली घेण्याची दुकानदारी बंद करावी लागणार असल्यामुळेच काँग्रेस राष्ट्रवादीचे नेते आंदोलन करीत असल्याची टीका सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी केली आहे.
केवळ महाराष्ट्रासह देशातील शेतकऱ्यांसमोर दिखावा करणाऱ्या पवार अँड कंपनीच्या नेत्यांचा खरा चेहरा आता देशासमोर उघडा पडला आहे असा टोला सुद्धा आ. अतुल भातखळकर यांनी लगावला.