CNG Price Hike : सातत्यानं वाढणाऱ्या महागाईनं सर्वसामान्य बेजार झाले आहेत. पेट्रोल-डिझेलपाठोपाठ आता सीएनजीच्या किमतीही कडाडल्या आहेत. महानगर गॅस लिमिटेडनं सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री बसणार आहे. मुंबईत सीएनजी (CNG) आणि पीएनजीच्या (PNG Price Hike) दरांमध्ये महिन्याभरात दुसऱ्यांदा वाढ झाली आहे. महानगर गॅस लिमिटेडनं मध्यरात्रीपासून सीएनजीचे दर प्रतिकिलो 6 रुपयांनी वाढवले आहेत. तर पीएनजीच्या दरांमध्ये किलोमागे 4 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई महानगर क्षेत्रात सीएनजीचे दर 86 रुपये प्रतिकिलोवर, तर पीएनजीचे दर 52.50 रुपये प्रतिकिलो झाले आहेत. 


महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या नव्या दरांनुसार, आता ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयांने खरेदी करावा लागेल. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. महानगर गॅस लिमिटेड (MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे. 


यापूर्वी मुंबईत सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात 4 रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात 3 रुपयांची वाढ करण्यात आली होती. तसेच, त्यापूर्वी 29 एप्रिल रोजीही दरांत वाढ करण्यात आली होती. सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा सीएनजीच्या दरांमध्ये वाढ करण्यात येणार आहे. सीएनजीच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळे सीएनजीच्या किमती आता पेट्रोलच्या किमतींशी स्पर्धा करतात की, काय? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


नागपुरात पेट्रोल आणि डिझेलपेक्षाही सीएनजी महाग


इंधनदरातील वाढीमुळे नागरिक त्रस्त असताना सीएनजीचा पर्याय वाहनधारकांसाठी होता. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या दरांमुळे इंधनाचा स्वस्त पर्याय म्हणून सीएनजीकडे पाहिले जात होतं. मात्र सीएनजीच्या दरांतही झपाट्यानं होणारी वाढ नागरिकांची चिंता वाढवत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी नेहमीच पेट्रोल डिझेलला पर्यायी इंधनाचा वापर करण्याचा सल्ला नागरिकांना देत असतात. मात्र गडकरींच्याच शहरात सीएनजीच्या दराचा भडका उडाला आहे. कारण नागपुरात सीएनजी पेट्रोल-डिझेलपेक्षाही महाग विकलं जात आहे. शहरात मोजकेच सीएनजीचे विक्रेते असून विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षाही महाग सीएनजी नागपूरात विकलं जात आहे. नागपूरमध्ये CNG चा दर हा 116 रुपये प्रति किलो आहे. तर पेट्रोलचा दर हा 106 रुपये 5 पैसे आणि डिझेलचे दर 92 रुपये 60 पैसे आहे.