Mumbai Crime News : बनावट भारतीय चलन छापून शहरात आणल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) चौघांना अटक केली आहे. कर्नाटकातून आलेले आरोपी इंटरनेटवरील काही व्हिडीओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटा छापण्यास शिकले. या आरोपींकडून कलर प्रिंटर, उच्च दर्जाचे बाँडपेपर, अनेक रंगांची शाई आणि कटिंग मशीन जप्त करण्यात आले आहे.


68,000 रूपयांच्या बनावट नोटा जप्त
पोलिसांनी आरोपींकडून 68,000 रूपयांच्या बनावट नोटा जप्त केल्या आहेत. तसेच त्यांनी आतापर्यंत काही लाखांहून अधिक चलनात आणल्या आहेत. सोलापूर आणि पश्चिम महाराष्ट्रातील इतर बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात चलन बाजारात आणले आहे. एका दुकानदाराने बनावट नोटा चलनात आणण्याच्या प्रयत्नाबाबत सावध केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला दादर रेल्वे स्थानकाजवळील फूल मार्केटमधून अटक केली. आनंद कुमार असे त्याचे नाव आहे आणि पोलिसांना त्याच्याजवळ 1200 रूपयांच्या सर्व बनावट नोटा सापडल्या. चौकशीदरम्यान कुमारने सांगितले की, त्याला कर्नाटकात राहणार्‍या शिवकुमार शंकर नावाच्या एका व्यक्तीकडून नोटा मिळाल्या आहेत. त्यानंतर आनंद कुमारने दिलेल्या माहितीची पडताळणी करण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रामकृष्ण सागडे यांच्या नेतृत्वाखालील एक पथक कर्नाटकला रवाना करण्यात आले.



मुंबई ते कर्नाटक कनेक्शन, पोलिसांनी लावला छडा


मुंबई पोलिसांनी अधिक तपास केला असता, आरोपी किरण कांबळे (24) हा कर्नाटकातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथे राहणारा असल्याची माहिती मिळाली आणि घटनास्थळी पोहोचल्यावर कांबळे हा काही भाड्याच्या खोलीतून काम करत असल्याचे समजले. कांबळे हा कर्नाटकात रस्ते कंत्राटदार म्हणून काम करायचा आणि त्याच्याकडे सरकारी परवाना होता, पण कोविड-19 साथीच्या आजारामुळे तो कामावर नव्हते. तो काही व्हिडिओ शेअरिंग प्लॅटफॉर्मवरून बनावट नोटा छापायला शिकला. शिवकुमार शंकर याच्यामार्फत बनावट नोटा चलनात आणल्या होत्या. पोलिसांनी आकाश तोडलगी यालाही अटक केली, ज्याने शिवकुमार शंकर यांच्याकडून नोटा घेऊन त्या मुंबईच्या बाजारपेठेत दिल्या होत्या. एक लाख किमतीच्या बनावट नोटांसाठी, त्याला अस्सल चलनात फक्त 25,000 रूपये भरावे लागले, असे अधिकाऱ्याने सांगितले. पोलिसांनी सांगितले की, कांबळे 500 आणि 2000 च्या नोटांच्या तुलनेत फक्त 100 आणि  200 च्या नोटा छापायचा, कारण त्या मार्केटमध्ये नीट तपासल्या जात नव्हत्या.


आरोपी नोटा कशा छापत होते? 
सूत्रांच्या माहिती प्रमाणे आरोपी एक नोट स्कॅन करायचे आणि मग त्याची कलर प्रिंटआउट एक्झिक्युटिव्ह बाँड पेपरवर घेत असे. त्यांनी मध्यभागी एक हिरवी चमकणारी रेषा देखील निश्चित केली आणि कटरच्या साहाय्याने चलनी नोटांच्या आकाराने कापले. नोटा खऱ्या दिसण्यासाठी त्या चुरगळल्या होत्या. पोलिसांच्या हाती सापडू नये म्हणून रात्रीच्या वेळी बनावट नोटा वापरत असत. आरोपींनी स्थानिक आठवडी बाजारात नोटा चलनात आणण्यास सुरुवात केली आणि विश्वास संपादन केल्यानंतरच बनावट नोटा कर्नाटकाबाहेर पाठवण्यास सुरुवात केली.