मुंबई: आधीच वाढत्या महागाईने पिचलेल्या सर्वसामान्यांना आणखी एक झटका बसला असून महानगर गॅस लिमिटेडने सीएनजी आणि पीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे. सीएनजीच्या दरात सहा रुपयांची तर पीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला असून आज मध्यरात्रीपासून हा निर्णय लागू होणार आहे. स्थानिक पातळीवर गॅसच्या सप्लायमध्ये कमतरता निर्माण झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचं महानगर गॅस लिमिटेडने (MGL) सांगितलं आहे.
महानगर गॅस लिमिटेडने जारी केलेल्या नव्या दरानुसार आता ग्राहकांना सीएनजी 86 रुपये प्रति किलोने तर पीएनजी 52.50 रुपयांने खरेदी करावा लागेल. देशांतर्गत गॅसच्या वाढलेल्या किमतीचा परिणाम एमजीएच्या उत्पादन किमतीवर होत असून, त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे असं महानगर गॅस लिमिटेडने आपल्या निवेदनात म्हटलं आहे. महानगर गॅस लिमिटेड ( MGL) ही मुंबईत सीएनजी आणि पीएनची पुरवठादार कंपनी म्हणून कार्यरत आहे.
या आधी मुंबईमध्ये सीएनजीचे दर 12 जुलै रोजी वाढले होते. त्यावेळी सीएनजीच्या दरात चार रुपयांची वाढ तर पीएनजीच्या दरात तीन रुपयांची वाढ करण्यात आली होती. त्यापूर्वी 29 एप्रिल रोजी सीएनजीच्या दरात चार रुपयांनी वाढ करण्यात आली होती. त्यानंतर आता पुन्हा त्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.
पेट्रोल-डिझेलच्या किंमती स्थिर
आज देशातील पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये कोणतीही वाढ अथवा घट झालेली नाही. महाराष्ट्र वगळता इतर राज्यांत तब्बल दोन महिन्यांहून अधिक काळापासून पेट्रोल-डिझेलचे दर (Diesel) स्थिर आहेत. दरम्यान, 14 जुलै रोजी महाराष्ट्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये अनुक्रमे 5 रुपये आणि 3 रुपयांची कपात केली होती. देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईत पेट्रोल 106.31 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 94.27 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे. तर दिल्लीत पेट्रोल 96.72 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 89.62 रुपये प्रति लिटर दरानं विकलं जात आहे.