मुंबई : मुंबई, पुणे, कोलकाता आणि दिल्ली यांसारख्या भारतातील प्रमुख शहरांमध्ये सायबर गुन्ह्यांच (Cyber Crime) प्रस्थ वाढत चालल्याचं चित्र सध्या आहे. क्विक हिलच्या (Quick Heal) सेक्‍यूराइट लॅब्‍सच्‍या अहवालामधून ही बाब निदर्शनास आलीये. यंदाच्या वर्षातील दुसऱ्या तिमाहीमध्ये सायबर गुन्ह्यांमुळे प्रभावित झालेल्या दहा शहरांपैकी कोलकाता शहर हे अव्वल स्थानी असल्याचं या अहवालातून समोर आलं. कोलकातामध्ये 07.08 दशलक्ष  सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याचं क्विक हिलच्या अहवालातून स्पष्ट झालं. तर कोलकातानंतर दुसरा क्रमांक हा मुंबईचा असल्याचं समोर आलं आहे. मुंबईत 7 दशलक्ष सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आलीये. 


या यादीमध्ये इतर काही शहरांचा देखील समावेश करण्यात आलाय. बंगळुरूमध्ये 4.86 दशलक्ष, सूरतमध्ये 4.16 दशलक्ष, हैदराबादमध्ये 3.50 दशलक्ष, अहमदाबादमध्ये 3.45 दशलक्ष, चेन्नईमध्ये 2.36 दशलक्ष आणि गुरुग्रमामध्ये 2.01 दशलक्ष सायबर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. एप्रिल ते जून 2023 या कालावधीमध्ये भारतातील सायबर गुन्ह्यांविषयी क्विक हिलचा अहवाल समोर आला. तर देशभरातील सेक्‍यूराइट लॅब्‍स तज्ञांनी 102.08 दशलक्षहून अधिक सायबरगुन्हे यावेळी शोधून काढल्याचं यावेळी समोर आलंय.  


सध्या सायबरसिक्‍युरिटी क्षेत्रामध्ये झपाट्याने वाढ होत चालल्याचं पाहायला मिळत आहे. त्याचप्रमाणे सायबरगुन्‍हेगारांना देखील अनेक नव्या पद्धतीने गुन्हे करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचं सांगण्यात येत आहे. 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत  विविध अॅप्‍लीकेशन्‍समध्ये नाविन्‍यपूर्ण टेक्निक्‍समध्‍ये वाढ होत चालल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान यामध्ये ज्‍यांचा गुगल प्‍लेवरील अँड्रॉईड गेमिंग अॅप्‍सच्‍या माध्यमातून प्रसार होता अशा हिडन अॅड्समुळे यामध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.


दरम्यान अशा बनावट अॅप्सपासून दूर राहण्याचा सल्ला क्विक हिलकडून देण्यात आला आहे. या अॅप्लिकेशन्समुळे फेसबुक किंवा गुगल क्रेडेन्शियल्स, जीपीएस लोकेशन्स ट्रॅक करणे, व्हिडिओ रेकॉर्ड करणे आणि हिडन सर्व्हरवर डेटा ट्रान्समिट करणे यांसारखी संवेदनशील माहिती चोरण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे आपली वयक्तिक माहिती अशा अॅप्लीकेशन्समध्ये वापरताना सांभाळून वापरण्याचे आवाहन देखील क्विक हिलकडून करण्यात आले आहे.


दरम्यान सायबर गुन्हेगारी ही बाब वाढत चालली असून त्यावर कठोर पावलं उचलणं फार गरजेचं आहे. तर यावर कठोर कारवाई करण्याची गरज असल्याचं यावेळी सांगण्यात येत आहे. तर ऑनलाईन गेमिंगसारखे प्लॅटफॉर्म्स वापरताना युजर्सनी देखील योग्य ती काळजी घ्यावी असं देखील क्विक हिलकडून सांगण्यात आलं आहे. 


हेही वाचा : 


Pune Crime News: पुण्यात सायबर चोरट्यांचा सुळसुळाट, आठ महिन्यात पुणेकरांनी गमावले 20 कोटीपेक्षा जास्त रुपये