मुंबई : नागपुरात (Nagpur) झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे महापुराचं संकट ओढावलं. यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळालं. नागपूरचे पालकमंत्री तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी नागपुरातील नुकसानाची पाहणी केली. यावेळी त्यांचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. तर त्यांचा हा व्हिडीओ शेअर करत काँग्रेसने देखील टीकास्त्र सोडलं. याच व्हिडीओवर भाजपकडून स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. 


नेमका काय आहे व्हिडीओ?


नुकसानाची पाहणी करत असताना एक नागरिक फडणवीसांच्या जवळ आला. तो फडणवीसांना झालेल्या नुकसानाबद्दल सांगण्याचा प्रयत्न करत होता. पण त्यावेळी फडणवीसांनी त्याचा हात धरला आणि त्याला गाडीच्या दिशेने नेले. यावर ट्वीट करत काँग्रेसने देवेंद्र फडणवीसांवर हल्लाबोल केला. तर फडणवीसांनी त्याला रागामध्ये ओढत नेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत होता. मात्र भाजपने या व्हिडीओवर स्पष्टीकरण देत विरोधकांना चोख उत्तर दिलं. 


भाजपने काय म्हटलं?


भाजपने यावेळी व्हायरल झालेल्या व्हिडीओसह आणखी एक व्हिडीओ जोडला आहे. यामध्ये फडणवीसांनी त्या नागरिकाच्या घरी जाऊन दुष्काळाची पाहणी केल्याचं दिसत आहे. यावर स्पष्टीकरण देताना भाजपने म्हटलं की, 'उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस  यांनी आज नागपुरातील पूरग्रस्त भागांना भेट दिली. त्यावेळी सदर व्यक्ती आणि इतर  अनेकांची इच्छा होती की देवेंद्र फडणवीसांनी आपल्याही घरी यावे. नागपुरातील प्रत्येकाचेच प्रेम असल्याने आपला नेता घरी यावा, अशी त्यांची इच्छा असण्यात गैर नाही.  पण, प्रत्येकाच्या घरी जाणे नेत्यालाही शक्य होतेच असे नाही. पोलिस त्याला थांबवित असल्याने, देवेंद्र फडणवीस यांनी त्याचा हात धरुन गर्दीतून त्याला आपल्या जवळ घेतले आणि ‘चल बाबा तुझ्याही घरी येतो’, असे म्हटले.  ते त्याचा हात धरुन त्याच्या घरी गेले सुद्धा. '






भाजपचं विरोधकांवर टीकास्त्र


यावेळी ट्वीट करत भाजपने विरोधकांवर देखील टीकास्त्र डागलं आहे. विरोधकांचा उल्लेख 'ट्रोलिंग गँग' असा केला आहे. यावर बोलताना भाजपने म्हटलं आहे की, 'जे जनतेमध्ये कधीच जात नाही तेच लोक अशा घटनेचे राजकारण करतात. उद्धव ठाकरे आणि काँग्रेस यांनी विरोधी पक्षाचे रचनात्मक कार्य सोडून ‘ट्रोलिंग गँग’चे काम स्वीकारले, त्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन!'


हेही वाचा : 


नागपुरात पुरामुळे अनेक घरं आणि दुकानांचं नुकसान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून नुकसानाची पाहणी