मुंबई : 14 सप्टेंबरला झालेल्या पहिल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सोमवारी आमदार अपात्रता प्रकरणातील दुसरी सुनावणी घेतली जात आहे. उद्याची सुनावणी एक प्रकारे नियमित सुनावणी जरी असली तरी याकडे procedural directional hearing म्हणून पाहिलं जाणार आहे. यामध्ये सुनावणी प्रक्रियेची पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.  म्हणजेच एक प्रकारे या प्रकरणातील सुनावणीचे वेळापत्रक समोर येण्याची शक्यता आहे. त्या वेळापत्रकानुसार या प्रकरणातील सुनावणी प्रक्रिया पार पडणार असल्याची माहिती आहे.
 
शिवसेना ठाकरे गटाने (Shiv Sena UBT) आमदार अपात्रतेच्या सुनावणीस उशीर होत असल्याचा मुद्दा उपस्थित करत सुप्रीम कोर्टात (Supreme Court) याचिका दाखल केली होती. त्यावरील सुनावणीत सुप्रीम कोर्टाने आमदार अपात्रतेच्या कारवाईच्या दिरंगाईवर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आता उद्या सुनावणी होणार आहे. उद्याच्या सुनावणीमध्ये सर्व आमदारांना हजर राहण्याची आवश्यकता नाही. आमदारांची बाजू त्या त्या गटाच्या वकिलांकडून उद्याच्या सुनावणीमध्ये मांडली जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या पुढील सुनावणीमध्ये विधानसभा अध्यक्षांना आपण या सगळ्या आमदार अपात्रता प्रकरणांमध्ये मागील चार महिन्यांमध्ये नेमक काय केलं? हे  याची माहिती सादर करायची आहे. 


या प्रकरणातील मागील सुनानी 14 सप्टेंबर रोजी पार पडली होती. त्यावेळी प्रत्येक आमदाराचे म्हणणे विधानसभा अध्यक्षांनी ऐकून घेतले होते. शिवसेना शिंदे आणि ठाकरे गटाला कागदपत्रे एकमेकांना देण्यासही सांगितले होते. त्याशिवाय, दहा दिवसांमध्ये याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर शिवसेना शिंदे गटातील आमदारांना उत्तर देण्यासाठी विधानसभा अध्यक्षांनी वेळ दिला होता. 


मागील आठवड्यात विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिल्ली दौरा करत काही कायदे तज्ज्ञांचा या सगळ्या प्रकरणात सल्ला घेतला असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी अधिक विधानसभा अध्यक्षां समोर होणाऱ्या या प्रकरणातील सुनावणीला वेग आल्याचे पाहायला मिळतंय. 


एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?


आमदार अपात्रता प्रकरणाबाबत मोठी बातमी आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Vidhan Sabha Speaker Rahul Narvekar) हे शिवसेना शिंदे गटाचे प्रमुख एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना येत्या एक-दोन दिवसांत नोटीस पाठवणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.  शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या याचिकांवरील सुनावणीसाठी दोन्ही गटांच्या पक्षप्रमुखांनी आपली बाजू एक-दोन आठवड्यात मांडण्याबाबत या नोटीसा बजावण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं होते. त्यामुळे आता उद्याच्या सुनावणीत नेमकं काय होणार आहे, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 


आमदार अपात्रतेच्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं काय म्हटलं? 


आमदारांच्या अपात्रतेसंबंधित आम्ही निर्देश देताना तीन महिन्यांची मर्यादा ठेवली नव्हती, पण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा आदर केला पाहिजे, असं सरन्यायाधीशांनी विधासभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बजावलं. आम्ही तीन महिन्यांची डेडलाईन जरी दिली नाही, तरी विधानसभा अध्यक्षांनी न्यायालयाचा अवमान करावा, असा त्याचा अर्थ नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं. या प्रकरणातील सुनावणीमध्ये वेळकाढूपणा का करताय? असे खडेबोल न्यायालयानं राहुल नार्वेकरांना सुनावलं होतं.