ठाणे : राष्ट्रीय हरित लवादाने तब्बल 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावल्यानंतरही अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये एमआयडीसीचं रासायनिक सांडपाणी थेट नद्यांमध्ये जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या विरोधात वनशक्ती एनजीओने राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केल्यानंतर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने बदलापुरातून सांडपाण्याचे नमुने घेतले आहेत. त्यामुळं एमपीसीबीला मोठा झटका बसलाय.


बदलापूर एमआयडीसीतून सोडल्या जाणाऱ्या रासायनिक सांडपाण्यामुळे उल्हास नदीत प्रदूषण होत असल्याचा आरोप वनशक्ती एनजीओने केलाय. याविरोधात वनशक्ती एनजीओने राष्ट्रीय हरित लवादाकडे तक्रार केल्यानंतरही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ याकडे दुर्लक्ष करत होतं. त्यामुळे राष्ट्रीय हरित लवादाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळासह स्थानिक स्वराज्य संस्थांना मिळून तब्बल 100 कोटी रुपयांचा दंड ठोठावला होता. मात्र त्यानंतरही थेट उल्हास आणि वालधुनी नदीत रासायनिक सांडपाणी सोडण्याचे प्रकार सुरूच असल्यानं वनशक्ती एनजीओने पुन्हा एकदा राष्ट्रीय हरित लवादाकडे याची तक्रार केली. त्यामुळे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या पथकाने बदलापूर एमआयडीसीतील सीईटीपी प्लँटमधून प्रक्रिया केलेल्या रासायनिक सांडपाण्याचे नमुने, आणि उल्हास नदीतील पाण्याचे नमुने तपासणीसाठी नेले आहेत.


दुसरीकडे अंबरनाथच्या आनंदनगर एमआयडीसीतील सीईटीपी प्लँट मात्र अनेक वर्षांपासून बंद अवस्थेत आहे. मध्यंतरी एका परदेशी कंपनीच्या माध्यमातून हा प्लँट सुरू करण्याचा प्रयत्न झाला. त्यासाठी प्रत्येक कंपनीतून किती सांडपाणी येईल या आणि अन्य माहितीचे अर्ज एमपीसीबीने मागवले. मात्र मागील तीन महिन्यांपासून हे अर्ज सायन इथल्या एमपीसीबीच्या कार्यालयात धूळ खात पडले आहेत. परिणामी कंपन्या थेट नदीत रासायनिक सांडपाणी सोडत आहेत. उद्या जर सीईटीपी प्लँट सुरू झाला, तर एमपीसीबी अधिकारी आणि कंपन्या यांचा काहीच संबंध राहणार नाही आणि एमपीसीबी अधिकाऱ्यांची चिरीमिरी बंद होईल, त्यामुळेच हा प्लँट सुरू केला जात नसल्याचा गंभीर आरोप अंबरनाथ एमआयडीसीतील कंपन्यांची संघटना असलेल्या 'आमा' म्हणजेच ऍडिशनल अंबरनाथ मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष उमेश तायडे यांनी केलाय.


या सगळ्यामुळे रासायनिक सांडपाणी मात्र थेट वालधुनी नदीत जात असून त्याचा स्थानिकांना मोठा त्रास होतोय. रात्री उग्र दर्प पसरणे, डोळे चुरचुरणे, श्वास घ्यायला त्रास होणे असे त्रास नागरिकांना होतायत.


या सगळ्याबाबत एबीपी माझाने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे विभागीय अधिकारी शंकर वाघमारे यांनी प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी प्रतिसाद दिला नाही. तर एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता दिलीप आव्हाड यांना विचारलं असता, एमपीसीबीने आम्हाला प्रदूषणकारी कंपन्यांची यादी दिली, तर आम्ही लगेच त्या कंपन्यांवर कारवाई करू, अशी भूमिका घेतली. याबाबत कॅमेरासमोर बोलण्यास मात्र त्यांनी नकार दिला. अंबरनाथ आणि बदलापूर शहरात होत असलेल्या या रासायनिक प्रदूषणामुळे निसर्गाचं मोठं आणि कधीही भरून न निघणारं नुकसान होतंय. त्यामुळं वेळीच या सगळ्याकडे गांभीर्यानं लक्ष देऊन उपायोजना करण्याची गरज आहे. अन्यथा एक दिवस अंबरनाथ आणि बदलापूरचा भोपाळ व्हायला वेळ लागणार नाही.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha



संबंधित बातम्या :