अंबरनाथ : ठाणे शहरात परप्रांतीय फेरीवाल्यांनी महापालिकेच्या सहाय्यक आयुक्तांची बोटं तोडल्याची घटना ताजी असतानाच आता अंबरनाथमध्येसुद्धा मुजोर फेरीवाल्यांनी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की, शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. अंबरनाथ पूर्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात बुधवारी संध्याकाळच्या सुमारास हा प्रकार घडला.


अंबरनाथ रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम भागात फेरीवाल्यांनी मोठ्या प्रमाणात बस्तान मांडलं आहे. गर्दीच्या वेळी तर फेरीवाल्यांच्या उच्छादामुळे प्रवाशांना आणि पादचाऱ्यांना चालायलाही जागा उरत नाही. त्यामुळे अंबरनाथ नगरपालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारी सायंकाळी अंबरनाथ पूर्व भागात स्टेशन परिसरातल्या फेरीवाल्यांवर कारवाई सुरू केली. 


यावेळी फेरीवाल्यांना त्यांच्या पाट्या आणि अन्य सामान उचलण्यास हे कर्मचारी सांगत होते. मात्र याचदरम्यान काही मुजोर फेरीवाले त्या ठिकाणी आले आणि त्यांनी अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचाऱ्यांना शिवीगाळ, धक्काबुक्की आणि मारहाण केली. अतिक्रमणविरोधी पथकातील कर्मचारी आनंद भिवाल, उमेश जहागिरदार, लक्ष्मण फर्डे आणि चालक नरेश पोटाळे या चौघांना यावेळी धक्काबुक्की, शिवीगाळ करण्यात आली. आता या मुजोर फेरीवाल्यांवर काय कारवाई होते हे पहावं लागेल.


कल्पिता पिंपळे यांना डिस्चार्ज
ठाणे महापालिकेच्या माजीवडा मानपाडा प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर 30 ऑगस्ट रोजी एका फेरीवल्याने चाकूने जीवघेणा हल्ला केला होता. ज्यामध्ये त्यांची 3 बोटे तुटली होती तर डोक्यावर गंभीर दुखापत त्यांना झाली होती. मात्र 2 वेळा शस्त्रक्रिया करून देखील त्यांना 2 बोटे कायमची गमवावी लागली आहेत. तर एक बोट पुन्हा हाताला जोडण्यात डॉक्टरांना यश आले आहे. आता त्यांना डिस्चार्ज मिळाला आहे. 


संबंधित बातम्या :