अंबरनाथ : महिलेची टेम्पोत प्रसुती झाल्यानंतर नवजात बाळ दगावल्याची दुर्दैवी घटना मुंबईशेजारच्या अंबरनाथजवळील मलंगगड परिसरात घडली. म्हात्रे पाडा या आदिवासी पाड्यात राहणाऱ्या वंदना वाघे यांना मध्यरात्री प्रसुतीसाठी मंगरुळ इथल्या प्राथमिक आरोग्य केंद्रात टेम्पोतून नेण्यात आलं. मात्र या आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने वंदना यांना उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात घेऊन जा असे तिथल्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी त्यांच्या कुटुंबियांना सांगितले. मात्र उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात वंदना यांना घेऊन जात असताना टेम्पोमध्येच त्यांची प्रसुती झाली आणि यात त्यांचं बाळ दगावलं.


मंगरुळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कोणत्या सुविधा नाहीत. परिणामी गरजेच्या वेळी इथे रुग्णांवर उपचार न करता पुढे पाठवण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे या आरोग्य केंद्राचा नक्की उपयोग काय असा सवाल इथले रहिवासी करत आहेत.


तर माळरानावर महिलेची प्रसुती झाली असती
एकीकडे मुंबई उपनगातील काही भागांमध्ये आरोग्य केंद्रात सुविधा नसल्याने अशी परिस्थिती ओढावली. तर दुसरीकडे परभणीच्या जिंतुर तालुक्यातील पिंप्राळा गावात रस्ता नसल्याने माळरानावर महिलेची प्रसुती होता होता राहिली. मात्र सुदैवाने स्थानिक पत्रकाराच्या मदतीमुळे महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मीरा शेकूराव गायकवाड या 27 वर्षीय महिलेला बुधवारी रात्री 9 वाजता प्रसव वेदना सुरु झाल्या आणि मात्र रस्ता नसल्याने त्यांना जिथपर्यंत जाता येत तिथपर्यंत दुचाकीवर घेऊन जाण्यात आलं. मात्र पुढे जाता येत नसल्याने त्यांना माळरानावरच थांबावं लागलं. अॅम्ब्युलन्सला फोन केला, काही खाजगी वाहनचालकांना ही नातेवाईकांनी बोलावलं, मात्र कोणीच आलं नाही. सुदैवाने ही बाब स्थानिक पत्रकाराला कळली आणि त्यांनी स्वतः जाऊन मोठ्या अडचणीतून त्या महिलेला रुग्णालयात दाखल केले तोच त्यांची प्रसुती झाली.


कोल्हापुरात भरपावसात रस्त्यातच महिलेची प्रसुती
तर सधन जिल्हा अशी ओळख असलेल्या कोल्हापुरातही मागील महिन्यात असाच प्रकार पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातील भुदरगड तालुक्यातील वासनोली पैकी जोगेवाडीचा धनगरवाडा इथे बांबूच्या डालाचा पाळणा करुन गर्भवतीला रुग्णालयात नेण्याची वेळ आली आणि रस्त्यातच भरपावसात महिलेची प्रसुती झाली. सुदैवाने बाळ सुखरुप जन्माला आलं. धनगरवाड्यावर जाण्यासाठी रस्ता नसल्याने नागरिकांची अवस्था अशी बिकट होत आहे. शिवाय मुसळधार पावसामुळे या पायवाटेवरुन चालणं देखील अवघड होतं.  रस्त्यासाठी वन विभागातून परवानगी मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.