Balasaheb Thackeray Death Anniversary : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज नववा स्मृतीदिन. या निमित्तानं मुंबईत शिवाजी पार्क इथल्या स्मृतीस्थळावर बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी शिवसैनिकांनी गर्दी केली आहे. स्मृतीस्थळावर फुलांची आरास करण्यात आली आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शिवसैनिक बाळासाहेबांना आदरांजली वाहण्यासाठी दाखल झालेत. गेल्या वर्षी कोरोनामुळे स्मृतीस्थळावर प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले होते. पण यावर्षी निर्बंध उठवण्यात आल्यानं शिवसैनिक स्मृतीस्थळावर दाखल झालेत. बाळासाहेबांच्या स्मृतीदिनानिमित्त सामनातून बाळासाहेबांच्या स्मृतींना उजाळा देण्यात आला आहे. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते . त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले, असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगना रनौतनं देशाच्या स्वातंत्र्याबाबद वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्याचाही आजच्या अग्रलेखातून समाचार घेण्याता आला आहे. "लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत , भगतसिंगांपासून ते चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढ्यातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते.", असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.
...तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते!
"महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते . त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले.हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. 'मातृभूमी'ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर 'लेक्चर' देतात. तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे. एक योद्धा शिवतीर्थावरून बळ देत आहे! ते महायोद्धाच होते!!", असं सामना अग्रलेखात म्हटलं आहे.
"हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्मरण आज आपण करीत आहोत. देशाची एकंदरीत स्थिती अशी झाली आहे की, 'आज शिवसेनाप्रमुख हवेच होते' असे जनतेला प्रकर्षाने वाटते. संकटाचे वादळ घोंघावू लागले, राष्ट्राच्या छपरावरची कौले उडू लागली की, लोकांना बाळासाहेबांची आठवण प्रकर्षाने होते. बांगलादेशात अल्पसंख्याक हिंदू समाजावर हल्ले झाले. हिंदू वस्त्या, मंदिरांची तोडफोड झाली. त्यानिमित्ताने त्रिपुरा राज्यात तथाकथित हिंदू संख्याकांनी आंदोलने केली. त्या आंदोलनांमुळे मुंबईतील कुण्या एका रझा अकादमी नामक इस्लामी संघटनेच्या भावना दुखावल्या. या मौलवींनी महाराष्ट्र बंदचे आवाहन केले. त्या बंदचे पडसाद फक्त विदर्भातील अमरावती शहरात उमटले. हिंसाचार घडवण्यात आला. रझा अकादमी ही एक पत्रकबाज संघटना आहे. हिंसाचार घडवणे, दगडफेक करण्याइतके बळ यांच्यापाशी नाही. तरीही त्रिपुरातील घटनेवरून महाराष्ट्रात बंदची हाक देणे हा प्रकार योग्य नाहीच. त्या बंदचा गैरफायदा घेऊन नकली हिंदुत्ववाद्यांनी अमरावती पेटवली. बाळासाहेब असते तर त्या फडतूस रझा अकादमीवाल्यांची 'बंद'ची पत्रके काढण्याची हिंमत झालीच नसती व विदर्भातील नकली हिंदुत्ववाद्यांचेही मुखवटे ओरबडून निघाले असते. उत्तर प्रदेशात निवडणुका जिंकण्यासाठी हिंदू-मुसलमानांत दंगली घडविण्याचे उद्योग सुरू झाले आहेत. तुमचे राजकारण तुमच्या राज्यात. त्यासाठी महाराष्ट्र का पेटविला, हाच प्रश्न शिवसेनाप्रमुखांनी चाबूक कडाडल्यासारखा विचारला असता. बाळासाहेबांनी लोकांना लढण्याचा, अन्यायाविरुद्ध रस्त्यावर उतरण्याचा मंत्र दिला. आधी मराठी म्हणून व नंतर अखिल हिंदू समाज गलितगात्र होऊन 'आलिया भोगासी' अवस्थेत खितपत पडला असताना त्याला राष्ट्रसंजीवक मंत्र देऊन त्याच्यात नवचैतन्य निर्माण करणारे बाळासाहेब ठाकरे यांचे आधुनिक हिंदुस्थानच्या इतिहासात अनन्यसाधारण स्थान आहे, हे विचारवंतांना आणि इतिहासकारांना मान्यच करावे लागेल.", असं अग्रलेखात म्हटलंय.
...तर बाळासाहेबांनी त्यांना पाच फुट जमीनीत गाडले असते
"आता गंमत अशी की, स्वतः बाळासाहेब हे स्वतःला विचारवंत वगैरे मानत नव्हते. विचारवंत म्हणवून घेणाऱ्यांच्या गोतावळ्यात ते कधी रमले नाहीत. विचारवंत ही शिवी आहे, असे त्यांनी जाहीरपणे सांगितले. स्वातंत्र्याची नवी व्यवस्था, नवी व्याख्या, नवा इतिहास सध्या रचला जात आहे. 1947 साली मिळालेले स्वातंत्र्य हे भीक आहे. खरे स्वातंत्र्य 2014 साली मिळाल्याचा साक्षात्कार काही गांजाड्यांना झाला आहे. त्याच गांजाडय़ांनी फेकलेल्या चिलमीच्या थोटकांचा झुरका मारून महाराष्ट्रातील काही भिकारडे लोक, 'होय होय, 1947 पर्यंतचा स्वातंत्र्यलढा, क्रांतिकारी हा बकवास आणि भिकाऱ्यांचे आंदोलन होते, असे त्याच 'तारे'त बरळू लागले आहेत. लोकमान्य टिळकांपासून ते वीर सावरकरांपर्यंत, सरदार पटेलांपासून ते नेताजी सुभाषचंद्र बोसांपर्यंत, भगतसिंगांपासून चापेकर बंधूंपर्यंत सगळ्यांना एकजात स्वातंत्र्यलढय़ातील भिकारी असे संबोधणाऱ्यांची गांजाची नशा बाळासाहेब ठाकरे यांनी एका दमात उतरवून त्यांना पाच फूट जमिनीत गाडले असते. आज महाराष्ट्रातील विरोधी पक्ष त्या गांजाच्या शेतीचे समर्थन करून स्वातंत्र्य, क्रांतिकारकांचा अवमान करीत आहेत. म्हणूनच लोक म्हणतात, आज बाळासाहेब हवे होते. बाळासाहेब हे सर्वसामान्य नेते किंवा सामान्य राजकारणी पुरुष नव्हते. प्रत्येक पिढीत नेते वा राजकारणी पुरुष अनेक असतात. ज्याला खऱ्या अर्थांने राष्ट्राचा महापुरुष, हिंदुत्वाचा महापुरुष असे संबोधिता येईल असा बाळासाहेबांसारखा क्वचितच एखाद् दुसरा 'पुरुष' आढळला असता. हा पुरुष आज शिवतीर्थावर विसावला आहे. याच पुरुषाने महाराष्ट्रासह देशात लोकांच्या मनात चेतना निर्माण केली. बाळासाहेब ठाकरे हे फक्त नाव नाही, तर गर्जनाच होती."
"छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल. हिंदूंची उमेद मरेल!'' हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व
सामना अग्रलेखात म्हटलंय की, "शिवसेनाप्रमुख म्हणून बाळासाहेबांनी आपल्याला काय दिले, हा मोठा विचार करण्याजोगा प्रश्न आहे. शिवसेनाप्रमुखांनी काळाचे आव्हान स्वीकारण्याचा मंत्र दिला. प्रखर हिंदुत्वाचा, राष्ट्रवादाचा हुंकार दिला! हिंदुत्वावर, हिंदू राष्ट्रावर व्याख्यान देणारे व लाठय़ाकाठय़ांची प्रात्यक्षिके करणारे खूप होते, पण राजकारणात हिंदू म्हणून एकजूट करणे त्यांना जमले नाही. शिवसेनाप्रमुखांनी हिंदूंच्या हाती आधी हातोडा दिला. तो हातोडा अयोध्येत निर्भयपणे चालवला. म्हणून आज रामजन्मभूमीवर राममंदिर उभे राहत आहे. त्यानंतर धर्मांध शक्तींविरुद्ध हिंदूंच्या हातात तळपणाऱ्या तलवारी दिल्या. हिंदू एकवटला, जात-पंथाच्या भिंती तोडून एक झाला व दिल्लीत हिंदू विचारांचे राज्य सुरू झाले ते आजतागायत व्यापक आहे! गुजरात दंगलीनंतर सारे जग 'मोदी हटाव, मोदी हटाव'च्या आरोळय़ा ठोकीत असताना आणि त्या आरोळय़ांत भाजपचेच वरिष्ठ मंडळ सामील झाले असताना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे दमदारपणे म्हणाले, 'छे, छे, मोदींना हटवले तर गुजरात हातचे जाईल. हिंदूंची उमेद मरेल!'' हे असे बाळासाहेबांचे बेडर हिंदुत्व. ओठात एक पोटात दुसरे हे धोरण नाही. ढोंगाला साथ कधीच नाही. महाराष्ट्र मजबूत राहिला तर देशाचा डोलारा भक्कम राहील हेच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे धोरण होते. त्याच धोरणाचे तोरण ते बांधत राहिले. हिंदू राष्ट्राची कल्पना त्यांनी मांडली, पण त्यांनी हिंदूंना सर्वधर्मसमभावाची शिकवण दिली. 'मातृभूमी'ला वंदन करणारा प्रत्येक धर्मीय आपला, देशाचा, असे ठासून सांगितले. विस्कळीत विचारांचे हिंदुत्व एका अवाढव्य ढिगाऱ्याप्रमाणे पडले होते. त्या अवाढव्य ढिगाऱ्याला शिवसेनाप्रमुखांनी एका वास्तूचे रूप दिले. त्या वास्तूत शिरलेले नेभळट आज शिवसेनेवर, हिंदुत्वावर 'लेक्चर' देतात. तेव्हा लोक म्हणतात आज बाळासाहेब हवेच होते! शिवतीर्थावर बाळासाहेब विसावले आहेत, पण ते विसावणेही प्रेरणा देत आहे. एक योद्धा शिवतीर्थावरून बळ देत आहे! ते महायोद्धाच होते!!"
महत्त्वाच्या इतर बातम्या :