मुंबई : पीएनबी बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी मेहुल चोक्सीला कोणताही दिलासा देण्यास मुंबईतील विशेष सीबीआय कोर्टानं नकार दिला आहे. चोक्सी विरोधात जारी केलेलं अजामीनपात्र अटक वॉरंट रद्द करण्यास शुक्रवारी कोर्टानं नकार दिला. सीबीईय कोर्टाचे न्यायाधीश व्ही. सी. बर्डे यांच्यासमोर यावर सुनावणी झाली.


मेहुल चोक्सी हा एक फरार आर्थिक गुन्हेगार असून अजामिनपात्र वॉरंट बजावूनही देशात परत येऊन तो तपासयंत्रणेपुढे हजर होत नाही. यावरुन तो गुन्हेगारच आहे हे सिद्ध करण्यास आणखीन नवा पुरावा कशासाठी हवा? असा दावा ईडीनं केला होता. मेहुल चोक्सीनं फरार आर्थिक गुन्हेगार कायद्याअंतर्गत सुरु असलेल्या कारवाई विरोधात मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत ईडीच्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी या याचिकेत केली आहे. मात्र, हायकोर्टानंही चोक्सीला कोणताही दिलासा देण्यास नकारच दिला आहे.

पंजाब नॅशनल बँकेला 13,400 कोटींना गंडा घालून मेहुल चोक्सी आणि घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेला त्याचा भाचा नीरव मोदी आपल्या कुटुंबकबिल्यासह देशातून पसार झालेले आहेत. यांच्या विरोधात ईडीनं पीएमएल कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. तसेच सीबीआयदेखील यांच्या मागावर आहे. वारंवार चौकशीचे समन्स बजावूनही हे आरोपी भारतात येऊन कोर्टापुढे आणि तपासयंत्रणेपुढे हजर होण्यास तयार नाहीत. त्यामुळे अखेरीस तपासयंत्रणेनं साल 2018 च्या फरार आर्थिक गुन्हेगार कायद्यानुसार मेहुल चोक्सीला फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केलं आहे. या कायद्यानुसार फरार आर्थिक गुन्हेगार घोषित केल्यास चोक्सीची जप्त केलेल्या साऱ्या संपत्तीवर टाच आणण्याची प्रक्रिया तपासयंत्रणेनं सुरु केली आहे. जेणेकरुन त्याची आर्थिक नाकाबंदी करणं शक्य होईल. मेहुल चोक्सीनं मात्र प्रकृती अस्वस्थ्याचं कारण देऊन तूर्तास भारतात परतण्यास असमर्थ असल्याचं आपल्या याचिकेत म्हटलं आहे.

काय आहे पंजाब नॅशनल बँक घोटाळा 
नीरव मोदी आणि त्याच्या कंपन्या परदेशातील कंपन्यांकडून कच्चे हिरे घेत आणि या विक्रेत्यांना विदेशी चलनात मोबदला देत असत. या कच्चे हिरे विक्रेत्यांचे भारतीय बँकांच्या विदेश शाखांमध्ये खाती होती. पंजाब नॅशनल बँकेतून नीरव मोदी अनधिकृतरीत्या लेटर ऑफ अंडरटेकिंग मिळवून बँकेच्या विदेश शाखेतून अल्पमुदतीचे कर्ज घेऊन विक्रेत्यांना पैसे देत होते. पंजाब नॅशनल बँकेने यासाठी हमी दिली होती. यासाठी मोदी आणि चोक्सीने बँकेच्या काही भ्रष्ट अधिकाऱ्याना हाताशी धरले होते. या अधिकाऱ्यांकडून मन मानेल तसे हे पत्र मिळविले जाई आणि त्या बदल्यात भारतीय बँकांच्या विदेश शाखेतून कर्ज उचलून विक्रेत्यांना पैसे दिले जात असत. यातच भारतीय बँकांच्या 30 विदेश शाखांना मिळून हा 11,400 कोटींचा गंडा घातला गेला आहे.

हेही वाचा -

पीएनबी घोटाळ्यातील आरोपी नीरव मोदी फरार घोषित, एफईओ कायद्याचा दणका

पीएनबी घोटाळ्यातील मुख्य आरोपींभोवतीचे फास आवळले

VIDEO | मेहुल चोकसीनं भारताचं नागरिकत्व सोडलं | ब्रेकफास्ट न्यूज | एबीपी माझा