मुंबई : शिवसेनेने महायुतीला मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील भाजपचं सरकार पडल्यानंतर पहिल्यांदाच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एबीपा माझाला मुलाखत दिली. राज्यातील आजच्या राजकीय परिस्थितीला शिवसेना जबाबदार असल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला. महायुती म्हणून लढल्यानंतर शिवसेना बाहेर पडली. देशात असं कधीही घडलेलं नव्हतं.


2019 ची निवडणूक आम्ही महायुतीत लढलो, त्याला राज्याच्या जनतेने स्पष्ट बहुमत दिले. तरीही शिवसेनेने मिळालेल्या जनाधाराचा विश्वासघात केल्याचा आरोप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. विधानसभा निवडणुकीत आम्ही ज्या जागा लढलो त्यातल्या 105 जागा आम्हाला मिळाल्या. आम्हाला यापेक्षा जास्त जागा अपेक्षित होत्या. 164 पैकी 130 जागा येतील अशी अपेक्षा होती. मात्र, आमच्या 105 जागा आल्या. मात्र, याला आम्ही पराभव म्हणणार. जनादेश आमच्याजवळ होता, मात्र आमच्या मित्रपक्षाने जनादेशाचा विश्वासघात केला त्यामुळे आम्हाला विरोधात बसावं लागलं असं देवेद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेने उघड आमच्या विरोधात काम केले : फडणवीस 
विधानसभा निवडणुकांमध्ये शिवसेनेने आमच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादीला उघड मदत केली. आमच्याही काही नेत्यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केली. मात्र, मी स्वतः फोन करुन बंडखोरी मागे घेण्यास लावली. भाजपला वेगळं पाडायचं हे शिवसेनेने आधीच ठरवलं होतं, त्यामुळेच शिवसेनेने आमच्या युती तोडल्याचे फडणवीस म्हणाले. आम्हाला कधीच वाटलं नाही, की शिवसेना काँग्रेससोबत जाईल. शिवसेनेने बाळासाहेबांचे विचार गुंडाळून काँग्रेस, राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर सरकार स्थापन केल्याचंही ते म्हणाले.

शिवसेनेसाठी कधीही दारं उघडं -
24 तारखेला निकाल लागल्यापासून आम्ही शिवसेनेसोबत जाण्यासाठी संवाद केला. मी स्वतः फोन केला. मात्र त्यांनी फोन घेतले नाहीत. उद्या बोलू असे निरोप त्यांच्या माणसांकडून यायचे. त्यानंतर राष्ट्रपती राजवट लागली. त्यानंतर आम्हाला एकटं पडलं असल्याचं लक्षात आल्याचं फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे आम्ही संवाद साधला नाही, हा सेनेचा आरोप चुकीचा असल्याचं त्यांनी माझाशी बोलताना सांगितले. दरम्यान, शिवसेना हा आमचा समविचारी पक्ष आहे, त्यामुळे त्यांच्यासाठी आजही दार उघडं असल्याचं सांगत त्यांनी पुन्हा एकदा सेनेला ऑफर दिली आहे.