मुंबई : आम्ही तीन दिवसांचं सरकार बनवण्यासाठी अजित पवारांबरोबर गेलो हे खरं आहे. अजित पवार यांनी तीन पक्षाची युती होऊ शकत नाही. मी पवार साहेबांची बोललो आहे. आपण स्थिर सरकार बनवू असं आम्हाला सांगितलं. त्यावेळी आम्ही गनिमी कावा म्हणून आम्ही शपथ घेतली आणि सरकार बनवलं, अशी माहिती माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  अजित पवार आमच्या फेल गनिमी काव्याचे नायक, आणि मी सहनायक असल्याचे फडणवीस यावेळी म्हणाले.  ते एबीपी माझावर दिलेल्या विशेष एक्स्क्लुझिव्ह मुलाखतीत बोलत होते. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी त्यांची मुलाखत घेतली.

यावेळी फडणवीस म्हणाले की, आम्ही अजित पवार यांच्याबरोबर जाताना खात्री करून घेतली होती. त्यावेळी त्यांच्या अनेक लोकांशी आम्ही बोलला. 36 आमदारांची बोलणं झालं होतं. त्यांच्या अनेक लोकांना आम्ही भेटलो देखील होतो. त्यांचं मूळ म्हणणं असं होत की त्यांचा पूर्ण पक्षच सोबत आहे, असे देखील फडणवीस म्हणाले. मात्र त्यानंतर आता वैयक्तिक कारणामुळे मी सोबत येऊ शकणार नाही असे त्यांनी सांगितलं. त्यानंतर मी लगेच राजीनामा दिला, असेही फडणवीस म्हणाले.

ते म्हणाले की, अजित पवार आमच्याकडे आले होते, आम्ही त्यांच्याकडे गेलो नाही. अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय आम्ही घेतला होता आणि तसं केंद्राला देखील तसं कळवलं. आम्ही गनिमी कावा म्हणूनच सकाळी शपथ घेतली. याची माहिती काही सिलेक्टिव्ह लोकांना दिली होती. अजित पवारांनी सांगितलं होतं की याबाबत शरद पवारांच्या कानावर टाकलं आहे. त्याचवेळी त्यांनी शरद पवारांचा होकार होता की नाही हे सांगितलं नव्हतं. त्यांनी दिलेलं पत्र आणि आमचं पत्र पाहूनच राज्यपालांनी सरकार स्थापनेची परवानगी दिली. सकाळी आठ वाजता शपथविधी केला. तो सकाळी दहा वाजता देखील करता आला असता, असेही ते म्हणाले. या प्रक्रियेत राष्ट्र्पतींकडे शिफारस कधी पाठवायची ते राज्यपाल ठरवतात. राष्ट्रपतींनी स्वीकारायची कधी हे राष्ट्रपती ठरवतात. आम्हाला विचारलं गेलं की आठ वाजता शपथ घेऊ शकलं का? आम्ही हो सांगितलं आणि शपथ घेतली. यात चुकीचं काही नाही, असेही फडणवीस म्हणाले.



ते म्हणाले की, आमचा सहयोगी पक्ष दुसऱ्या कुणासोबत चालला आहे त्यावेळी आम्हाला जर कुणी सहयोग करायला तयार असेल त्यावेळी त्यांच्यासोबत सरकार बनवण्याचा निर्णय आम्ही घेतला. आम्ही फार खुशीने अजित पवारांसोबत गेलो नाही. आता मी त्यांच्यासोबत जाण्याचं समर्थन करत नाही. कदाचित ते चुकीचं असेल. मात्र ते चूक की बरोबर हे काळ ठरवेल. सिंचन घोटाळ्यासंबंधी आमची भूमिका अजूनही बदललेली नाही.  माझ्या मतापेक्षा आपल्या ज्यांनी विरोधात याचिका केल्या आहेत त्यांच्या भूमिका महत्वाच्या आहेत. एका प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे की, सचिवाच्या सहीवर अजित पवारांनी सही केली. त्यामुळे ईडी दोषी आहेत. तर दुसऱ्यामध्ये सरळ अजित पवारांवर आरोप आहेत. दोन अॅफिडेबिटमध्ये फरक आहे. मात्र मंत्र्याने सही केली तर मंत्री दोषी आहेतच. उच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली हा तपास चालू आहे. उच्च न्यायालय जो निर्णय दिलं तो निर्णय अंतिम असेल, असे फडणवीस म्हणाले.