मुंबई : राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार (NCP Sharad Pawar)यांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अटक केलेल्या अभिषेक पाटील याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या चौकशीदरम्यान काही खळबळजनक माहिती हाती लागली आहे. शरद पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्याप्रकरणी अटकेतील आरोपी अभिषेक पाटील आणि संदीप गोडबोले यांच्यातील फोन संभाषण मुंबई पोलिसांच्या हाती लागलं आहे. पवारांच्या घरावर झालेल्या हल्ल्यानंतर या दोघांनी एकमेकांशी फोनवरुन संवाद साधल्याची माहिती. पवारांच्या घरावरच्या हल्ल्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांना आझाद मैदानातून हुसकवण्यात आलं होतं. आणि त्यानंतर अनेक आंदोलकांनी सीएसएमटी स्थानकाकडे मोर्चा वळवला. या आंदोलकांना तिकीटासाठी पैसे दिल्याचा उल्लेख अभिषेक आणि संदीप यांच्यातील फोन संभाषणामध्ये आढळून आला आहे.
पोलिसांना अभिषेक पाटील आणि नागपूरमधून ताब्यात घेतलेल्या संदीप गोडबोले यांच्यातील संवादाची क्लिप हाती लागली आहे.
यामध्ये नेमका काय संवाद झालाय हे पाहुयात...
अभिषेक - हॅलो
संदीप - बोल अभिषेक
अभिषेक - तिथेच जाऊ का ?
संदीप - हा तिथेच जायचे
अभिषेक - आम्ही त्या बंगल्याच्या इथे चपला सोडल्या, आम्ही लवकर अगोदर आलो, आम्ही फोटो पण काढलेत, तिथे आता लय लोक आलेत, काढले ना लोक म्हणून तर हे काय झाले साहेब, करावं तर सगळं आपणचं करावं, बाकीचे निवांत बसावं, इथे येऊन साहेबांना लगेच सांगितलं, मुदलियार पाटील आतच आलेत. आता रात्रभर मैदानात आलेत, सकाळी 9 पर्यंत अंघोळ करून पण येऊ नये का?
संदीप - आता कुठे आहेत, तुम्ही कुठे आहात आता?
अभिषेक - हा इथे सगळ्या महिला घेतल्यात. डायरेक्ट त्यांना तिकिटांना पैसे दिलेत. तिकिट काढलेत निघालेत सगळे, 70 ते 80 महिला आणि माणसं आहेत 100 ते 200.
संदिप - महालक्ष्मी पेट्रोलपंप कुठे आहे विचारा
अभिषेक - पेट्रोलपंपवर ना मीडिया आली
संदिप - मीडिया आली आहे
अभिषेक - चला मीडिया आली भाऊ
संदीप - हो
नागपुरातून संदीप गोडबोले पोलिसांच्या ताब्यात
शरद पवारांच्या घरावरील हल्ल्याप्रकरणी अॅड. गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. तसंच आरोपी अभिषेक पाटील आणि चंद्रकांत सूर्यवंशी यांना 16 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. तसंच 17 एप्रिलपर्यंत सदावर्ते यांचा ताबा घेण्याची सातारा पोलिसांना परवानगीही देण्यात आली आहे. अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी साताऱ्यात सदावर्तेंवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान सिल्व्हर ओकवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी नागपुरातून संदीप गोडबोले नावाच्या एसटी कर्मचाऱ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
संबंधित बातम्या :