ठाणे : मत्स्य व्यवसाय करणाऱ्या ठाण्यातील भावांचं मलेशियात अपहरण करण्यात आलं होतं. खंडणी म्हणून वैद्य भावंडांकडे एक कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. सुदैवाने दोघांची सुखरुप सुटका करण्यात आली.
डोंबिवलीत राहणारे रोहन प्रकाश वैद्य आणि कौस्तुभ प्रकाश वैद्य व्यापारासाठी मलेशियात गेले होते. त्यांचा 'रॉक फ्रोझन फूड' नावाचा माशांचा व्यवसाय होता. दरवर्षी दोघं व्यापारानिमित्त परदेशी जायचे, मात्र मलेशियात दोघांचंही अपहरण झालं.
दोघांच्या कुटुंबीयांना एक ते तीन ऑगस्ट दरम्यान तीनवेळा अपहरकर्त्यांनी फोन केला. दोघांच्या सुटकेसाठी अपहरणकर्त्यांनी एक कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. याबाबत अपहृतांच्या कुटुंबीयांनी डोंबिवली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी चार ऑगस्ट रोजी अपहरणाचा गुन्हा दाखल केला. तपासासाठी पोलिसांनी तीन टीम तयार केल्या. स्थानिक पोलिस मलेशिया पोलिसांच्या संपर्कात होते. ठाणे पोलिस भारतीय दूतावास यांच्याशी संपर्क ठेवून होते. अखेर त्यांची सुखरुप सुटका झाल्याचं मलेशियन पोलिसांनी ठाणे पोलिसांना कळवलं.
या प्रकरणी डोंबिवली पोलिस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल केला असून लवकरच दोघं भारतात परतणार आहेत. याबाबत ठाणे पोलिस अधिक तपास करणार असल्याची माहिती अप्पर पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांनी दिली.