मुंबई : आगामी गणेशोत्सवात किमान मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि पुण्यात तरी बेकायदेशीर मंडप उभारायला देऊ नका, असे स्पष्ट निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने संबंधित महापालिका आणि राज्य सरकारला दिले आहेत. हायकोर्टाने दिलेल्या आदेशांचं पालन न झाल्यास न्यायालयाचा अवमान केल्याबद्दल कारवाई करण्याचा थेट इशाराही मंगळवारी हायकोर्टाने दिला.

रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा न आणता केवळ एक तृतीयांश जागेतच, सर्व बाबींची पूर्तता करुन परवानगीसह मंडप बांधण्याची मंडळांना परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर सायलेंस झोनच्या नियमांचीही काटेकोरपणे अंमलबजावणी करत लाऊड स्पीकर्सचा वापर आणि ध्वनी प्रदूषणासाठी आखून दिलेल्या नियमांची अंमलबजावणी करण्याचंही हायकोर्टानं सांगितलं.

मुंबईत सध्याच्या घडीला 110 शांतता क्षेत्र निश्चित करण्यात आली असून त्यावरील काम सुरु असल्याचं राज्य सरकारने हायकोर्टात सांगितलं.

मुंबई-ठाण्यासह राज्यभरात सण उत्सवांच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणासंदर्भात आवाज फाऊंडेशन तर बेकायदेशीर मंडपांविरोधात ठाण्यातील डॉ. महेश बेडेकर यांनी दाखल केलेल्या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर एकत्रित सुनावणी सुरु आहे.