मुंबई : मालमत्ता कर थकबाकीसाठी पालिका वेगवेगळी शक्कल लढवत आहे. आधी मुंबई पालिकेनं दवंडी दिली नंतर मोठ्या व्यावसायिक थकबाकीदारांवर जप्तीची कारवाई सुरु केली. पालिकेकडून एका आठवड्याभरात 3392 मालमत्ता कर थकवणाऱ्या मालमत्ता जप्त तसेच 200 थकबाकीदारांचे पाणी तोडण्याची देखील कारवाई करण्यात आली. मात्र आता ही कारवाई अधिक वेगानं करण्यासाठी खाजगी कंत्राटदार नेमण्याचा पालिकेचा विचार आहे.


खाजगी कंत्राटदार नेमल्यास कर वसूली अधिक वेगानं होईल असा मुंबई महानगरपालिकेचा दावा असला तरी महापालिकेकडे पुरेसे मनुष्यबळ आणि यंत्रणा असताना खाजगी कंत्राटदाराचाच आग्रह का? असा प्रश्न आता समोर येत आहे. महानगरपालिका सध्या ज्या गतीनं मालमत्ता कराची वसूली करत आहे त्या गतीनं मालमत्ता कर वसूलीचं लक्ष्य गाठलं जाऊ शकतं. मात्र, तरीही खाजगी कंत्राटदारांचा यातील सहभाग गैरव्यव्हारांनाही आमंत्रण देऊ शकतो.

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात सुमारे 4 लाख 50 हजार मालमत्ता धारक आहे. यामध्ये 1 लाख 27 हजारांपेक्षा अधिक निवासी, 67 हजारांपेक्षा अधिक व्यवसायिक, औद्योगिक स्वरुपाच्या 6 हजारांपेक्षा अधिक मालमत्ता धारक आहे. 12 हजार 156 भूभाग आणि इतर प्रकारच्या मालमत्तांचा समावेश आहे. या मालमत्तांच्या मालमत्ता-कराचे आर्थिक वर्ष 2019-20 चे वसुली लक्ष्य हे 5 हजार ४०० कोटी रूपये एवढे आहे. यापैकी गेल्या आठवड्यापूर्वी पर्यंत 3 हजार 154 रूपये कोटी एवढी रक्कम वसूल झाली होती. यानुसार दैनंदिन वसुली ही साधारणपणे 10 कोटी रुपये एवढीच होती.

गेल्या आठवड्यापासून महापालिकेने थकबाकीदारांवर कठोर कारवाईचा बडगा उगारताच सुरुवातीला कर भरण्यास टाळाटाळ करणा-या अनेकांनी मालमत्ता कर भरण्यास सुरुवात केली आहे. ज्यामुळे 10 कोटी असणारी दैनंदिन वसुली आता दररोज 40 ते 50 कोटींपर्यंत पोहचली आहे. यानुसार गेल्या आठवड्याभरातच 350 कोटी रुपयांचा भरणा थकबाकीदारांनी महापालिकेकडे केला आहे.

BMC 2022 | 'अब की बार भाजप सरकार', मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आशिष शेलारांचा नारा



संबंधित बातम्या :

मुंबई महापालिकेची मालमत्ता करवसूलीची कारवाई सुसाट, आठवड्याभरात 3392 कर थकवणाऱ्या मालमत्ता जप्त

मालमत्ता कर वसूलीसाठी पालिकेची दवंडी, पुढच्या आठवड्यापासून जप्तीची कारवाई

मुंबई महापालिकेकडून 228 मालमत्तांवर जप्तीची कारवाई