मालमत्ता कराची वसूली थकल्यानं मुंबई महापालिकेला मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे, तिजोरीची गळती कमी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच एक भाग म्हणून, मुंबई महापालिकेकडून आता दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा करण्याविषयी मुंबईकरांना सूचना दिल्या जात आहेत. मुंबईच्या प्रत्येक वॉर्डमध्ये अशी दवंडी पिटून मालमत्ता कराचा भरणा न केल्यास काय कारवाई होऊ शकते हे ही सांगितले जात आहे.
कारवाईत मालमत्तेची जप्ती होऊ शकते तसेच पाणीपुरवठा रोखला जाऊ शकतो. 500 स्क्वेअर फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी दिल्यानंतर पालिकेला 398 कोटींचा फटका बसला आहे. त्यात, निश्चित धोरणाच्या अभावामुळे इतर मालमत्तांचीही वसूली रखडली आहे. एकूण मुंबई महापालिकेचा एकूण 12 हजार कोटींचा मालमत्ता कर थकला आहे. त्यापैकी 9000 हजार कोटींच्या मालमत्ता करासाठी विविध कोर्ट केसेस सुरु आहेत.
उर्वरीत 3000 कोटींच्या थकीत मालमत्ता करापैकी 1,500 कोटींचा मालमत्ता कर येत्या दोन महिन्यांत म्हणजेच मार्च अखेरीपर्यंत (आर्थिकवर्ष समाप्तीपर्यंत) वसूल करण्याचं लक्ष्य आहे. यासाठी, मुंबई महापालिकेनं मालमत्ता कर वसूलीची मोहिम हाती घेतली आहे. मुंबईकरांना मालमत्ता कर भरणासाठी जागृत करण्यासाठी ही मोहीम आहे.
पुढील आठवड्यापासून महापालिका आक्रमक होत टॉप 5 व्यावसायिक मालमत्तांची कर न भरल्यास जप्ती करणार आहे. 10 व्यावसायिक मालमत्तांचा कर न भरल्यास लिलाव होणार आहे. महापालिकेनं सुरुवातीला प्रत्येक वॉर्ड मधील 100 अशा 24 वॉर्ड मधील 2400 व्यावसायिक मालमत्तांची वसूली तातडीनं करण्याचे किंवा त्यांवर कारवाई करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
रहिवासी भागांतील मालमत्तांवर मात्र इतक्यात कारवाई होणार नाही. मात्र, सर्वसामान्य करदात्या मुंबईकरांनी लवकरात लवकर मालमत्ता कर भरावा यासाठी पालिकेनं मोठी मोहीम हातात घेतली आहे.