मुंबई: शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरेंनी साडेआठ हजार कोटींची रस्तेकामे रखडल्याचा आरोप केल्यानंतर महापालिका प्रशासनाकडून (BMC) त्यांना प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केलेले सर्व आरोप हे निराधार असून वस्तुस्थितीशी सुसंगत नसल्याचं महापालिकेने म्हटलं आहे. तसेच या आरोपानंतर मुंबई महानगर क्षेत्रात सुरू असलेल्या सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांबाबत सद्यस्थितीदर्शक माहिती देण्यात आली आहे.
महापालिकेने काय म्हटलंय?
बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनामार्फत रस्ते सुधारणांसाठी रस्त्यांचे सिमेंट कॉंक्रिटकरण प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या रस्ते कामांबाबत प्रसारमाध्यमांतून आरोप करण्यात आले आहेत. हे सर्व आरोप निराधार आणि वस्तुस्थितीशी विसंगत असून त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही.
बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारा 397 किलोमीटर अंतराच्या एकूण 910 रस्त्यांचे काँक्रिटीकरणा करीता जानेवारी 2023 मध्ये कंत्राटदारांना कार्यादेश देण्यात आले असून सदर कामे पाच मोठ्या कंत्राटदारांमार्फत प्रगतिपथावर आहेत.
मुंबईतील पश्चिम उपनगरात एकूण 96 ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील 83 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत व 13 ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर आहे. लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.
मुंबईतील पूर्व उपनगरात एकूण 27 ठिकाणी कामे सुरु आहेत. त्यातील 19 ठिकाणी पर्जन्य जलवाहिनीची कामे प्रगतिपथावर आहेत. 8 ठिकाणी वाहतूक मार्गाकरीता खोदकाम प्रगतिपथावर असून लवकरात लवकर काँक्रिटीकरण करण्यात येईल.
शहर विभागातील कंत्राटदाराला नोटीस बजावण्यात आली असून कायदेशीर प्रक्रिया सुरु आहे. तिथेही लवकरच काम सुरु करण्यात येईल.
मुंबईकरांच्या दर्जेदार रस्ते निर्मितीसाठी महानगरपालिकेने सातत्याने या प्रकल्पासाठीचा पाठपुरावा केला आहे. या कॉंक्रिट रस्त्यांमुळे मुंबईतील नागरिकांना खड्डेमुक्त रस्ते उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यंदा पावसाळ्यात देखील प्रकल्प रस्त्यांवरील खड्डे बुजवून नागरिकांना वाहतुकीचा त्रास होणार नाही, यादृष्टीने खबरदारी घेत देखभालही केली आहे.
काही प्रसारमाध्यमांमध्ये सिमेंट कॉंक्रिट रस्त्यांच्या निमित्ताने करण्यात आलेले आरोप हे वस्तुस्थितीला अनुसरून नाही. सबब, जनमानसात कोणताही गैरसमज पसरु नये, यासाठी सदर वस्तुस्थितीदर्शक खुलासा करण्यात येत आहे.
काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली होती. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहे आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai Police) एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे. गेले 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटिशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचं आहे.
ही बातमी वाचा: