मुंबई: शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहे आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी (Mumbai Police) एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे असा आरोप आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यानंतर या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला. ते म्हणाले की, गेले 10 ते 12 महिने आम्ही रस्त्यांचा विषय मांडतोय. मुंबईत पाच पॅकेट कॉन्ट्रॅक्टर आहेत. त्यांपैकी एका कॉन्ट्रॅक्टरला टर्मीनेशन नोटीस गेली. या नोटिशीला कंत्राटदारानं उत्तर दिलं. त्याची सुनावणी महापालिकेत या आठवड्यात होणार आहे. या सुनावणीनंतर कंत्राटदारावर कारवाई होते की खोके घेऊन कारवाई थांबवली जाते हे आम्हाला बघायचं आहे.
एनओसी न देण्यासाठी ट्रॅफिक पोलिसांवर दबाव
एका वर्षात खड्डेमुक्त मुंबई करू असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं. मुंबईत रस्त्याची कामे 1 ऑक्टोबर ते 31 मे पर्यंत पूर्ण होतील असं राज्य सरकारने सांगितलं आहे. पण मुंबईत एकाही रस्ते कामाला सुरुवात नाही. अडीच हजार कोटींची कामे तशीच्या तशी पडून आहेत. ट्रॅफिक पोलिसांच्या एनओसी न मिळाल्याचे दाखवून रस्त्याची कामे रखडवली जातायेत. मोठा गाजावाजा करुन सहा हजार कोटीच्या कामांची घोषणा केली, नारळ फोडला. पण ती कामेही पडूनच आहे.
मुंबईत धुळीमुळे मोठं प्रदूषण होतंय. त्याच त्या गाईडलाईन काढल्या जात आहेत. कन्स्ट्रक्शन साईटवरुन येणाऱ्या धुळीवर कोणतंही नियंत्रण नाही. 24 पैकी 15 वॉर्डमध्ये वॉर्ड ऑफिसर नाही. परीक्षा होऊन निकालही लागला पण नियुक्त्या खोक्यांसाठी थांबल्या असल्याचा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला.
आमचं सरकार लवकरच येईल, आमचं सरकार ज्यांनी मुंबईला लुटलं त्यांना जेलमध्ये टाकणारच असा इशाराही आदित्य ठाकरे यांनी दिला.
ही बातमी वाचा: