BMC Property Tax Collection : मुंबई महापालिकेकडून (Mumbai Municipal Corporation) सरलेल्या आर्थिक वर्षात 5 हजार 575 कोटी रुपये मालमत्ता कर (Property Tax) संकलन झालं आहे. निर्धारित 4 हजार 800 कोटी रुपयांच्या तुलनेत तब्बल 775 कोटी रुपयांचा म्हणजे 16.14 टक्के अधिक कर संकलन करण्यात यश आलं. करनिर्धारण आणि संकलन खात्याची ही लक्षणीय कामगिरी केली आहे.


लक्ष्याच्या तुलनेत तब्बल 775 कोटी रुपये अधिक मालमत्ता कर संकलन 


मालमत्ता कर हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत आहे. काल (31 मार्च 2023) अखेर म्हणजे 2022-2023 या आर्थिक वर्षात 5 हजार 575 कोटी 44 लाख रुपये इतके मालमत्ता कराचे संकलन करण्यात आले आहे. सरत्या आर्थिक वर्षात 4 हजार 800 कोटी रुपये मालमत्ता कर एवढं निर्धारित लक्ष्य होतं. मात्र या लक्ष्याच्या तुलनेत तब्बल 775 कोटी रुपयांचे म्हणजेच 16.14 टक्के अधिक कर संकलन करण्यात करनिर्धारण व संकलन खात्याला यश आलं आहे.


मालमत्ता कर हा मुंबई महापालिकेचा उत्पन्नाचा महत्त्वाचा स्त्रोत


मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना महानगरपालिकेद्वारे विविध नागरी सेवा सुविधा सातत्यपूर्ण पद्धतीने नियमितरित्या देण्यात येतात. या अनुषंगाने 'मालमत्ता कर' हा मुंबई महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा कायमच महत्त्वाचा स्त्रोत राहिला आहे. या अनुषंगाने सातत्याने नियोजन आणि आढावा बैठकांचे आयोजन करण्यासोबतच कार्यवाही आणि कारवाई याचे सूक्ष्मस्तरीय नियोजन तसंच अंमलबजावणी सातत्याने करण्यात आली. 


5 हजार 575 कोटी 44 लाख रुपये मालमत्ता कराचं संकलन


परिणामी, काल दिनांक 31 मार्च, 2023 रोजी मध्यरात्री 12 वाजता संपलेल्या आर्थिक वर्षात मालमत्ता कराची वसुली ही 5 हजार 575 कोटी 44 लाख रुपये इतकी झाली आहे, अशी माहिती सहआयुक्त (करनिर्धारण व संकलन) सुनील धामणे आणि सहाय्यक आयुक्त (करनिर्धारण व संकलन) महेश पाटील यांनी दिली आहे.


अतिशय सुयोग्य नियोजन आणि परिणामकारक अंमलबजावणी यामुळे निर्धारित लक्ष्य 4 हजार 800 कोटी रुपयांपेक्षा साडेसातशे कोटी रुपये अधिक म्हणजेच 5 हजार 575 कोटी रुपयांचा मालमत्ता कर संकलित झाला आहे, असं महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.


मुंबईत मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर कारवाई


मुंबई महानगरपालिकेने मालमत्ता कर थकवणाऱ्यांवर काही दिवसांपूर्वीच कारवाई केली होती. या अंतर्गत 67 थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करण्यात आल्या होत्या. या सर्व मालमत्ता धारकांकडे मिळून 267 कोटी 88 लाख रुपयांचा मूळ कर तर 87 कोटी 31 लाख रुपयांचा दंड अशी एकूण 355 कोटी 19 लाख रुपयांची रक्कम थकीत होते. त्यामुळे या संपूर्ण रकमेच्या वसुलीसाठी या 67 थकबाकीदारांच्या इतर स्थावर मालमत्ता आणि गुंतवणुकीचा शोध घेण्यासाठी महानगरपालिकेने व्यावसायिक संस्थेची नेमणूक करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. 


हेही वाचा


BMC Budget 2023 : मुंबई बजेटचा धमाका, पहिल्यांदाच 50 हजार कोटी पार, कोणतीही नवी करवाढ नाही, प्रदूषण रोखण्यावर भर