मुंबई :  मुंबई महापालिका निवडणुकीसाठी जाहीर करण्यात आलेली वॉर्ड पुर्नरचना आता वादाच्या भोव-यात सापडत आहे. नव्या वॉर्डच्या रचनांमुळे मुंबईत काही ठिकाणी एक प्रभाग दोन प्रशासकिय वॉर्डमध्ये वाटला गेला आहे. त्यामुळे अशा एका प्रभागाच्या नगरसेवकाला आणि स्थानिक रहिवाशांनाही कामं करण्यासाठी दोन प्रशासकिय वॉर्ड ऑफिसमध्ये खेटे घालावे लागणार आहेत.


यंदाच्या निवडणुकीनंतर निवडून आलेले नगरसेवक जेव्हा कामाला लागतील तेव्हा काही ठिकाणच्या नगरसेवकांना एका वेगळ्याच डोकेदुखीला तोंड द्यावं लागणार आहे. कारण, जिथून लोकांची मतं घेऊन जिंकून आलो आहोत.  तिथल्या लोकांची कामं करण्याकरता नगरसेवकांना दोन-दोन वॉर्ड ऑफिसमध्ये खेटे घालावे लागतील.  कारण, नव्या प्रभागरचनेनुसार  मुंबईतील दोन ठिकाणचे प्रभाग वेगवेगळ्या वॉर्डमध्ये वाटले गेले आहेत. 


मुंबईत ज्या ठिकाणी एक प्रभाग दोन वॉर्ड ऑफिसमध्ये वाटला गेला आहे.  तिथे कॉंग्रेसचे नगरसेवक आहेत, त्यामुळे कॉंग्रेसचा बालेकिल्ला असला तरी त्या जागी निवडून येणा-या नगरसेवकाला पुढची पाच वर्ष दोन - दोन वॉर्डमध्ये हेलपाटे मारावे लागणार आहेत. 


 यापूर्वी 2012 मध्येही अशा प्रकारे दोन वेगवेगळ्या प्रशासकिय वॉर्डमध्ये वाटले गेलेले सात प्रभाग होते. त्यानंतर 2017 मध्ये  झालेल्या निवडणुकीत हा दोष दूर करुन एक प्रभाग एक प्रशासकिय वॉर्ड हा नियम करण्यात आला. मात्र, राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर पुन्हा 2022 च्या निवडणुकीत एका नगरसेवकाचा पाय दोन प्रशासकिय वॉर्डात असणार आहे.


व्यवस्था सुटसुटीत असेल तर विकासकामांना आणि अडचणी सोडवायला वेग येतो. मात्र, व्यवस्था जाणीवपूर्वक किचकट करुन ठेवली तर आपोआपच कामं न होण्याकरता कारणांची भली मोठी जंत्री सादर करता येते. प्रशासकिय व्यवस्थेला या अंगभूत किचकटपणातून सोडवण्याकरता राजकिय इच्छाशक्ती प्रबळ हवी. ही इच्छाशक्ती दाखवून यंदाच्या वॉर्ड पुर्ननरचनेतला सावळा गोंधळ सावरता येईल का हे पहाणं महत्वाचं आहे. 


संबंधित बातम्या :


BMC : मुंबईचे महापालिकेचे वॉर्ड आता 'असे' असतील; नवीन वॉर्ड पुनर्रचना प्रारूप अधिसूचना जाहीर 


BMC New Wards : वाढीव नऊपैकी सहा वॉर्ड शिवसेनेचे बालेकिल्ले; भाजपकडून आक्षेप नोंदवला जाण्याची शक्यता



मुंबई महापालिकेची वाढवलेली प्रभाग संख्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालावर आधारीत


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha