मुंबई : भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून माटुंग्यातील रुईया महाविद्यालयात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलं होतं.  यावेळी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) उपस्थित होते. या कार्यक्रमात लता मंगेशकर यांच्या निधनानंतर प्रथमच मंगेशकर कुटुंबियांच्या (Mangeshkar Family) प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावेळी आदिनाथ मंगेशकर(Adinath Mangeshkar),उषा मंगेशकर (Usha mangeshkar) आणि ह्रदयनाथ मंगेशकर (Hrudaynath Mangeskar) यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.


लतादीदी गेल्यानं संगीत युगांत झालाय; हृदयनाथ मंगेशकर भावूक
लता मंगेशकरांच्या निधनानंतर प्रथमच मंगेशकर कुटुंबियांच्या प्रतिक्रिया समोर येतायेत. लता मंगेशकर यांचे अंत्यदर्शन, अंत्ययात्रेवेळी राज्य सरकारकरडून करण्यात आलेल्या नियोजनाबद्दल मंगेशकर कुटुंबियांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरेंचे आभार मानले आहेत. लतादीदी गेल्यानं संगीत युगांत झाला आहे. संगीतात सातच स्वर असतात पण, लता हा आठवा स्वर आहे. यावेळी लतादीदींविषयी बोलतांना लता मंगेशकर यांचे भाऊ ह्रदयनाथ मंगेशकर भावूक होताना दिसले. 


मुंबईत लतादीदींचं स्मारकरुपी संगीत महाविद्यालय; श्रद्धांजली कार्यक्रमात उदय सामंतांची घोषणा
संगीत महाविद्यालयाकरता लतादीदी मला दीड महिन्यानं भेटणार होत्या. संगीत महाविद्यालयाचं नाव लतादीदींच्या नावानंच असेल. भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालयाचा जीआर मंगेशकर कुटुंबाशी बोलल्यानंतर निघाला आहे. स्मारकरुपी संगीत महाविद्यालय मुंबईत कलिना येथे असेल अशी माहिती उदय सामंत यांनी दिली.  ३ एकर जमिनीवर हे संगीत महाविद्यालय सुरु होईल.


लतादीदींचे स्वप्न होणार पूर्ण


आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालय स्थापन करण्याचे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. भारतात दीनानाथ मंगेशकर संगीत महाविद्यालय असावे असे लता मंगेशकर यांचे स्वप्न होते. कलिना कॅम्पससमोर असे विद्यालय स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने यापूर्वीच घेतला होता. त्यासाठी एका समितीची स्थापनाही करण्यात आली होती. आता याच समितीने आंतरराष्ट्रीय संगीत महाविद्यालयाचे नाव भारतरत्न लता दीनानाथ मंगेशकर असे असावे असा प्रस्ताव दिला. त्यानंतर लतादीदींच्या निधनानंतर आता हे आंतरराष्ट्रीय महाविद्यालय स्थापन करण्यात येत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी माहिती देताना सांगितले.