Mumbai: येत्या पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) क्षेत्रातील विविध यंत्रणांमध्ये समन्वय साधला जावा,या दृष्टीने महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांच्या मार्गदर्शनात बैठक पार पडली. मुंबईतील विविध यंत्रणांनी पावसाळ्याच्या काळात पूरपरिस्थितीच्या आव्हानावर मात करण्यासाठी सज्ज रहावे, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या. पूराचा धोका टाळण्यासाठी सर्व यंत्रणांनी पावसाळापूर्व कामांमध्ये चोख भूमिका बजावावी, असे आवाहन पालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी केले. 


उपनगरीय लोकलसेवा सुरळीत सुरू राहावी, याची काळजी घेण्याचे आवाहन


रेल्वे आणि मुंबई पालिकेने मागच्या वर्षीच्या पावसाळ्यात अतिशय उत्तम काम केल्यानेच उपनगरीय लोकल सेवा सुरळीत सुरू होती. यंदाही त्याच धर्तीवर उत्तम पद्धतीने काम करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले. रेल्वे परिसरातील वृक्ष छाटणी मोहीम मे महिन्याच्या अखेरीपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी उद्यान विभागाला दिल्या. 


यंदा नागरिकांना हवामानाच्या माहितीचे एसएमएस मिळणार


आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून पावसाळ्याच्या कालावधीत हवामानाचे वेळोवेळी अलर्ट देणारी यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे. नागरिकांना पावसाळ्याच्या कालावधीत वेळोवेळी अपडेट्स देणारी मॅसेजची यंत्रणा यंदा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. एका एसएमएस ॲपच्या सहाय्याने हे एसएमएस अलर्ट नागरिकांना पाठवण्यात येतील. 


मुंबईतील 480 ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप लागणार


अतिवृष्टीच्या काळात पाणी साचणाऱ्या ठिकाणी पाणी उपसा करणारे पंप 480 ठिकाणी लावण्यात येणार आहेत, या पंपांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात येणार आहे. तसेच पाणी साचण्याच्या परिस्थितीत पंप योग्य पद्धतीने काम करतील याची पूर्वतयारी म्हणून मॉक ड्रिल करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. 


रस्त्यांवर खोदकामास परवानगी नाही


मुंबई शहर आणि उपनगरात 15 मे नंतर रस्त्यांवर खोदकामासाठी कोणतीही परवानगी देऊ नये, अशा सूचना पालिका आयुक्त चहल यांनी सर्व यंत्रणांना दिल्या. अतिशय आपत्कालीन परिस्थितीतच ही परवानगी देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 


9 मीटरपेक्षा कमी रूंदीच्या रस्त्यांची जबाबदारी आता विभागाकडे


मुंबईतील 9 मीटर रस्त्यांची जबाबदारी ही स्थानिक पातळीवर सहाय्यक आयुक्तांची असणार आहे. पावसाळ्यापूर्वी या रस्त्यांवर कोणतेही खड्डे नसतील यासाठीचा दौरा सहाय्यक आयुक्त आणि उपआयुक्त यांनी आपल्या विभागात करावा, असे निर्देशही चहल यांनी दिले. 


पावसाळी आजारांसाठी 3 हजार बेड्स सज्ज


आगामी पावसाळी आजारांसाठीची तयारी मुंबई पालिकेकडून 3 हजार बेड्स राखीव ठेवण्यात आले आहेत. हिवताप (मलेरिया), डेंग्यू नियंत्रणासाठीची बैठक नुकतीच पार पडली असून जनजागृतीसाठीच्या उपाययोजना करण्यात आल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी यावेळी स्पष्ट केले. 


तात्पुरत्या निवाऱ्यासाठी प्रत्येक विभागात 5 शाळांची व्यवस्था


आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून प्रत्येक विभागात 5 शाळांमध्ये अतिवृष्टीसारख्या प्रसंगी नागरिकांची व्यवस्था करण्यात येणार आहे. याठिकाणी अन्न आणि तात्पुरत्या निवाऱ्याची सुविधा देण्यात येणार आहे. 


एनडीआरएफ, भारतीय नौदल, अग्निशमन दलाला सज्ज राहण्याच्या सूचना


मुंबईत आपत्कालीन परिस्थितीत मदतकार्यासाठी एनडीआरएफचे 3 पथक सज्ज असणार आहेत. भारतीय नौदलालाही त्यांचे पथक आणि पाणबुडे (डायव्हर्स) यासह सुसज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या. तर अग्निशमन दलानेही आपत्कालीन परिस्थितीसाठी सज्ज राहण्याचे निर्देश आयुक्तांनी बैठकीदरम्यान दिले. 


धोकादायक इमारतींसाठी मोहीम राबवा


सी 1 श्रेणीतील धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत. धोकादायक इमारतींमधील रहिवाशांना इमारत रिकामी करण्याच्या नोटीस बजावण्याच्या, तसेच रहिवाशांसाठी पर्यायी व्यवस्था करण्याच्याही सूचना आयुक्तांनी दिल्या. धोकादायक इमारतींचा पाणी पुरवठा खंडित करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.


राडारोडा उचला


मेट्रोसह विविध कामांच्या ठिकाणी कोणताही राडारोडा राहणार नाही, याची जबाबदारी संबंधित यंत्रणेने घ्यावी असे आदेश आयुक्तांनी दिले. प्रत्येक विभागातील सहाय्यक आयुक्तांनी आपल्या विभागातील राडारोडा काढण्यासाठी यंत्रणेशी साधावा, असेही ते म्हणाले.


दरडी कोसळण्याच्या ठिकाणी उपाययोजना करा


मुंबईत पूर्व उपनगरांमध्ये दरडी कोसळण्याचा धोका आहे. याठिकाणी संरक्षक भिंती बांधण्याचे काम विविध यंत्रणांच्या माध्यमातून सुरू आहे. अशा ठिकाणी उपाययोजना करण्याचे निर्देश पालिका आयुक्तांनी दिले.


पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांच्या रस्त्यांची देखभाल काटेकोरपणे करा


मुंबई पूर्व आणि पश्चिम उपनगरातील द्रुतगती मार्गांवरील देखभाल आणि दुरूस्तीची जबाबदारी यंदा मुंबई पालिकेकडे आहे. त्यामुळे द्रुतगती मार्गावर कामाची देखरेख विभागीय पातळीवर काटेकोरपणे व्हावी, असेही निर्देश आयुक्तांनी दिले.


आपल्या विभागातील नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची पाहणी करा


नाल्यातून गाळ काढण्याच्या कामांची वेळोवेळी पाहणी करावी, असेही निर्देश आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी लोकप्रतिनिधींना दिले.


हेही वाचा:


Aryan Khan Case: समीर वानखेडेंसह इतर एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त; सीबीआय चौकशीची तारीखही ठरली