Jumbo Covid Centers scam: कोरोना काळात मुंबई पालिकेच्या कंत्राटात घोटाळा झाल्याच्या आरोपानंतर पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीची नोटीस आली. या नोटीशीनंतर इक्बालसिंह चहल ईडी चौकशीसाठी हजर झालेत. मात्र, हा चौकशीचा सिलसिला कसा मागे लागला? याबाबत सध्या चर्चा सुरु आहे.. याचीच माहिती जाणून घेऊयात... 


चीनच्या पाठोपाठ राज्यात कोरोनाचा फैलाव होताना बघायला मिळाला आणि राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी राज्य सरकार आणि पालिकेकडून विविध उपाय योजना करण्यात आल्या. यात सर्वात श्रीमंत पालिका समजल्या जाणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या वतीनं ज्या आरोग्य सुविधा पुरवण्यात आल्या, त्यात कंत्राटं देताना गैरव्यवहार झाल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला.  जवळपास 100 कोटींच्या घोटाळ्याचा आरोप करण्यात आला होता. ईडीकडून याबाबत बीएमसी आयुक्त इक्बाल सिंह चहल यांना नोटीस पाठवण्यात आली होती. आज इक्बालसिंह चहल यांची चार तास चौकशी करण्यात आली. 


कोविड घोटाळ्याच्या चौकशीसाठी सोमय्यांनी आझाद मैदान पोलिस स्थानकात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. मात्र, हे सर्व प्रकरण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आले. यासंदर्भात कॅगची चौकशी देखील करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली होती. त्यातच ईडीकडून पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची चौकशी झाल्यानंतर गरज लागल्यास आपण तपास यंत्रणेला सर्वतोपरी मदत करु असं विधान चहल यांनी केलं आहे. 


किरीट सोमय्यांनी यांनी 100 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचे आरोप केले आहेत. मेसर्स लाईफ लाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्विसेस कंपनीवर गैरव्यवहाराचे आरोप करण्यात आले आहेत. या गुन्ह्यात सुजीत पाटकर, डॉ हेमंत गुप्ता, संजय शहा आणि राजू साळुंखे यांना आरोपी बनवण्यात आले आहे.  आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल झालेला गुन्हा तपासासाठी आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग झाला होता. मात्र याप्रकरणी 38 कोटींच्या घोटाळ्याचा दावा गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेसोबतच ईडीकडून देखील समांतर चौकशी सुरु झाली. 


इक्बालसिंह चहल यांच्या चौकशीनंतर पालिकेतील आणखी काही अधिकाऱ्यांची चौकशी होण्याची शक्यता आहे. सोबतच सुजीत पाटकर आणि आणखी काही जणांची चौकशी ईडीकडून होऊ शकते. त्यामुळे ईडीच्या रडारवर पुन्हा एकदा सुजीत पाटकर यांचं नाव पुढे आलं आहे. त्यामुळे किरीट सोमय्यांचा नेमका निशाणा कोणावर आहे? आणि ईडीच्या रडारवर आणखी कोण आहेत? हेबघणं महत्त्वाचे असणार आहे.