Mumbai: आर्यन खान ड्रग्स प्रकरणात (Aryan Khan Drugs Case) खंडणी मागितल्याच्या आरोपाप्रकरणी सीबीआय (CBI) आणखी सक्रिय झाली आहे. सीबीआयने समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यासह इतर एनसीबी अधिकाऱ्यांचे फोन जप्त केले आहेत. सीबीआयने सोमवारी (15 मे) ही कारवाई केली आहे. या सर्व मोबाईल फोनचे तांत्रिक विश्लेषण केलं जाणार आहे. समीर वानखेडे यांच्यासह विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांचेही वापरातील फोन सीबीआयने जप्त केले आहेत.


सीबीआय टीम 18 मे रोजी समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची चौकशी करणार आहे. या चौकशीआधी मोबाईल जप्तीची ही मोठी कारवाई सीबीआयकडून करण्यात आली आहे. सीबीआयने (CBI) काही दिवसांपूर्वी समीर वानखेडेंच्या गोरेगावच्या घरी छापा टाकला होता. तेव्हाच समीर यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकरचा मोबाईलही जप्त करण्यात आला. समीर वानखेडेंची चौकशी झाल्यानंतर विश्वविजय सिंग, आशिष रंजन यांनाही सीबीआय चौकशीसाठी समन्स बजावणार आहे.


काय आहे आर्यन खान प्रकरण?


एनसीबीने 2 ऑक्टोबर 2021 रोजी आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनसवर मुंबईहून गोव्याला जाणाऱ्या कॉर्डेलिया क्रूझवर छापा टाकला होता. यावेळी पाच ग्रॅम मेफ्रेडॉन, 13 ग्रॅम कोकेन, 21 ग्रॅम चरस, एमडीएमएच्या 22 गोळ्या आणि एक लाख 33 हजारांची रोकड जप्त केली होती. यावेळी एनसीबीने या क्रूझवरून आर्यन खानसह आठ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं. यानंतर एनसीबीनं याप्रकरणी आर्यन खानसह अन्य आरोपींविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली होती. 


एनसीबी अधिकाऱ्यांनी आर्यनच्या मोबाईलमधील व्हाट्सअ‌ॅप चॅट मिळवले होते. अभिनेत्री अनन्या पांडे आणि आर्यन खान यांच्यात ड्रग्सबाबत चर्चा झाल्याचा एनसीबीचा आरोप होता. या दोघांतील व्हाट्सअ‌ॅप संवाद एनसीबी अधिकाऱ्यांनी कोर्टातही सादर केला होता. 


आर्यन खानसह त्याचा बालमित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यासह जवळपास 20 जणांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर आर्यनला बरेच दिवस तुरुंगात राहावं लागलं होतं. हे प्रकरण देशभरात गाजलं होतं. त्यानंतर आर्यन खानसह सहा जणांना क्लीनचिट मिळाली. 


या प्रकरणात पैशाची मागणी करण्यात आल्याचा आरोप नंतर करण्यात आला. प्रसिद्धी आणि पैशासाठी हे सर्व घडवण्यात आल्याचा आरोप राज्याचे माजी मंत्री नवाब मलिक यांनी केला होता. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला नंतर या प्रकरणातून क्लीन चिट मिळाली. 


हेही वाचा:


Karnataka Government Formation : काँग्रेस हायकमांड इतकं दुर्बल कधीच नव्हतं, राज्यातले नेतेच हायकमांडला झुकवत करत आहेत दबावाचं राजकारण!