मुंबई : भाजपचे (BIP) 15 ते 20 नगरसेवक आमच्या संपर्कात असल्याचा दावा स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केल्यानंतर आता भाजप आक्रमक झाले आहे. आता शिवसेनेच्या (SHIVSENA) या फोडाफोडीला भाजप देखील ऑपरेशन लोटसने (OPRATION LOTUS) उत्तर देण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे मुंबईत सध्या ऑपरेशन धनुष्यबाण विरुद्ध ऑपरेशन लोट्स असा वाद पहायला मिळत आहे.
मुंबई महानगर पालिका (BMC) ही सर्वात श्रीमंत महानगरपालिका असून सगळ्यांचे लक्ष असलेल्या या पालिकेची निवडणूक येऊ घातली आहे. यामुळे आता राजकारण देखील तापले आहे. मात्र यावेळी आघाडीवर आहेत ते कधी काळी एकमेकांच्या गळ्यात गळे घालून सत्ता उपभोगणारे भाजप आणि शिवसेना हे दोन पक्ष आहे. एकमेकांवर टीका करणाऱ्या या दोन्ही पक्षांकडून आता नगरसेवक फोडण्याची भाषा होऊ लागली आहे. शिवसेना नेते यशवंत जाधव यांनी तर भाजपचे नगरसेवकच फोडण्याची भाषा केली आहे.
आता शिवसेनेने नगरसेवक फोडण्याची भाषा केल्याने भाजप नेते तरी कसे गप्प राहतील. आधीच ऑपरेशन लोट्ससाठी आघाडीवर असलेल्या भाजपने देखील शिवसेनेला धमकी वजा इशारा दिला आहे. दोन्ही पक्षांकडून नगरसेवक फोडण्याची भाषा होत असताना सध्या पालिकेत कुणाचे किती नगरसेवक आहेत.
शिवसेनेचे पालिकेत 97 नगरसेवक, तर भाजपचे 83 नगरसेवक आहेत. काँग्रेस 29, समाजवादी 6, मनसे – 1, एमआयएम – 1, अभासे - 1 अशी नगरसेवक संख्या आहे.
2017 च्या निवडणुकीत पालिकेत सत्तेचे स्वप्न पाहिलेल्या भाजपला निकालानंतर पहारेकऱ्याची भूमिका पार पाडावी लागली. मात्र आता शिवसेनेतील नाराज नगरसेवकांना गळाला लावून भाजप पालिकेतील सत्ता स्थापन करण्याचे स्वप्न पूर्ण करणार का? की शिवसेना भाजपचे नगरसेवक फोडून भाजपचे ऑपरेशन लोट्स धुळीस मिळवणार? यासाठी दिवाळीपर्यंत वाट बघावी लागणार आहे.