मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीच्या (BMC)  पार्श्वभूमीवर शिवसेना मुंबईतल्या भाजप (BJP) गटात मोठा धमाका करण्याच्या तयारीत आहे. मुंबई महापालिकेत शिवसेनेकडून येत्या डिसेंबरमध्ये ऑपरेशन धनुष्यबाण केलं जाणार आहे. मुंबई महापालिकेतील 15 ते 20 भाजप नगरसेवक लवकरच शिवसेनेत प्रवेश करतील असं वक्तव्य महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी केले आहे. 


 भाजपनं सुरु केलेला मेगाभरतीचा ट्रेंड आता सगळ्याच पक्षांमध्ये फेमस होतोय. शिवसेनेनंही पालिकेत मेगाभरती आयोजित केली आहे.  भाजपच्या वरिष्ठ नेत्याच्या मनमानी कारभाराला कंटाळलेले भाजपचे 15 ते 20 नगरसेवक आमच्या संपर्कात आहेत असं म्हणत शिवसेनेनं पालिकेच्या राजकिय वर्तुळात खळबळ माजवली आहे.



 


महापालिकेत  शिवसेनेनं केलेलं हे पहिलं ऑपरेशन नाही, यापूर्वी शिवसेनेनं 2017 मध्ये मनसेचे  सहा नगरसेवक फोडून मुंबई महापालिकेतून मनसेचं अस्तित्वच बाद केलं. आताही भाजपकडून वारंवार शिवसेनेवर भ्रष्टाचाराच्या आणि घोटाळ्यांच्या आरोपांचे हल्ले होत आहेत. शिवसेनाही याचंच  प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत आहे. पण सेनेचा हा बार फुसका निघेल असा भाजपचा दावा आहे. 


भाजपला सापडला नवा भिडू, भाजप-मनसे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर एकत्र येणार?


सध्या महापालिकेत भाजपचे 83 तर शिवसेनेचे 97 नगरसेवक आहेत. मुंबई महापालिकेत शंभरपार जाण्याचा संकल्प सेनेनं केलाच आहे. मात्र, हा संकल्प आगामी निवडणुकीपूर्वीच सत्यात उतरवण्याचा सेनेचा हा प्रयत्न राजकारणाला कोणता रंग आणतोय हे येत्या निवडणुकीत कळेलच. 


मुंबई महागनगरपालिकेत सध्या काय आहे संख्याबळ?


शिवसेना :- 97
भाजप :-   83
कॅाग्रेस :-  28
राष्ट्रवादी :- 08
सपा :-  06
एमआयएम :-  02
मनसे - 01


हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून शिवसेना आणि भाजपची युती 25 वर्षांहून अधिक काळ टिकली. मात्र विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने या आपल्या जुन्या मित्राची साथ सोडत काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. यामुळे आता शिवसेनेला शह देण्यासाठी भाजप नव्या भिडूच्या शोधात असून, त्यांना आपला नवा भिडू देखील सापडला असून, भविष्यात हिंदुत्वाच्या मुद्द्यावर हे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची दाट शक्यता आहे. भाजपचा हा नवा साथीदार दुसरा तिसरा कुणी नसून, भाजप मनसेच्या साथीने शिवसेनेला शह देण्याचा मनसुबा रचत असल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळत आहे.