मुंबई : पाच वर्षांचा अयान बोलू शकत नाही आणि अनेकदा तर तो स्वत:च्याच जगात हरवलेला असतो. तीन वर्षांचा असल्यापासूनच अयान असा आहे. शाळेत गेल्यावर त्याची विचित्र वागणूक कमी होईल असं त्याच्या पालकांना वाटलं होतं. पण कोरोनाची साथ आणि त्यापाठोपाठच्या टाळेबंदीमुळे अयानला प्रदीर्घ काळ घरातच बसून रहावं लागल्यामुळे अयानची चीडचीड होऊन त्याचे पालकही हैराण झाले आहेत. ऑनलाईन वर्गांना बसण्यास अयान नाखूष असल्यामुळे बालवयात त्याच्यावर जे उपचार-थेरपी करणे शक्य होते, ते न झाल्यामुळे पाच वर्षांचा होऊनही अयानची सामाजिक परिपक्वता एक वर्ष सात महिन्यांच्या बालकाइतकीच राहिली आहे. 
 
अयानबाबत जे घडलं आहे, तेच असंख्य स्वमग्न मुलांबाबत घडलं आहे. कोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे या मुलांना अत्यंत महत्वाची असलेली थेरपी-उपचारपद्धतीला मुकावं लागलं. अनेक स्वमग्न मुलं तर अशी आहेत, ज्यांच्यात सातत्यपूर्ण थेरपीमुळे अत्यंत सकारात्मक बदल दिसू लागले होते, ज्यांचा मानसिक विकास होत होता, मात्र महासाथीमुळे या थेरपीत प्रदीर्घ काळ खंड पडल्यामुळे त्यांच्या मानसिक विकासात नवीन अडथळे आणि आव्हानं निर्माण झाली आहेत. "ही मुलं घरातच राहिल्याने आणि अतिकाळजी करण्याच्या पालकांच्या स्वभावामुळे अनेक विशेष मुलांमध्ये वागणुकीच्या गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. काही मुलं तर घरात चीडचीड, त्रागा करु लागली आहेत. विशेष मुलांच्या मानसिक विकासप्रक्रियेतील सुवर्ण कालखंड करोना महासाथीने हिरावून घेतल्याची भावना पालकांमध्ये निर्माण झाली आहे", अशी माहिती 'चाईल्ड रिहॅबिलिटेशन सेंटर'चे बालरोगतज्ज्ञ आणि ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी दिली. 


डॉ. सुमीत शिंदे पुढे म्हणाले, स्वमग्नता ही एक जन्मस्थ न्यूरोलॉजिकल मनोवस्था आहे, जिच्यामुळे मुलांची समाजात मिसळण्याची क्षमता, संवाद आणि वागणूक सामान्य मुलांसारखी नसते. समाजात मिसळण्यासाठी अशा विशेष मुलांना सातत्यपूर्ण उत्तेजना आणि समुपदेशन तसंच प्रशिक्षणाची गरज असते. कोरोना टाळेबंदीमुळे एक ते तीन वर्षांची विशेष बालकं आणि तीन ते सहा वर्षांची विशेष प्री-स्कूल मुलं यांच्या मानसिक विकास कार्यक्रमात अडथळे निर्माण झाले.  


वय वर्ष दोन ते चार या वयोगटात असताना मुलांमध्ये संवाद साधतानाची आणि समाजात मिसळतानाची अडचण दिसून येऊन स्वमग्नता (ऑटिझम) तसंच अटेंशन डेफिसिट हायपअॅक्टिव्हिटी डिसॉर्डर (एडीएचडी) यांची लक्षणं आढळून येतात. या वयातच मुलांमधील स्वमग्नतेचे निदान होणे, पुढील थेरपी तसंच समुपदेशनाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे असते, असंही ऑक्युपेशनल थेरपिस्ट डॉ. सुमित शिंदे यांनी सांगितलं. 


गेल्या दीड वर्षभरात विशेष मुलांमध्ये निर्माण झालेल्या समस्या :


1. कोरोना टाळेबंदी आणि बाहेर पडण्याच्या भीतीमुळे विशेष-स्वमग्न मुलांना घराच्या चार भिंतीतच प्रदीर्घ काळ रहावं लागलं. यामुळे त्यांना नियमित थेरपी-उपचार- समुपदेशन उपलब्ध झाले नाही.


2. घरातच अडकून पडल्यामुळे विशेष मुलांची समाजात मिसळण्याची सवय तुटली. आजूबाजूचे लोक, सामान्य समवयीन मुलं यांचा सहवास त्यांना लाभला नाही. त्यामुळे समाजात मिसळण्याची त्यांची क्षमता विकसित झाली नाही. 


3. स्वगम्न तसंच मानसिक विकास-वाढीची समस्या असलेल्या विशेष मुलांसाठी खुले सामाजित वातावरण सर्वात महत्वाचे असते. या वातावरणाला ही मुलं मुकली. 


4. सर्वसामान्य लहान मुलांनी कोविड काळात जरी ऑनलाइन अभ्यास केला असला तरी स्वमग्न मुलांसाठी अशा प्रकारे शिक्षण घेणं खूप कठीण, त्रासदायक आहे. ऑनलाइन वर्गांसाठीची पुरेशी मानसिक क्षमता नसल्यामुळे स्वमग्न मुलांचे गेल्या एक-दीड वर्षांत शैक्षणिक नुकसानही झाले, असंही डाॅ. सुमीत शिंदे यांनी सांगितलं.