BMC Eleciton 2022 : मुंबई महापालिका निवडणुकांसाठी मंगळवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. या आरक्षण सोडतीचा मोठा फटका काँग्रेसला बसला आहे. काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षित झाले आहेत. काँग्रेसने यावर नाराजी व्यक्त केली आहे. नगरविकास खात्याच्या निर्देशावरुनच प्रशासनानं मुंबईतील वॉर्ड पुर्नरचना आणि आरक्षणात फेरफार केले असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या वॉर्ड पुनर्रचनेविरोधात काँग्रेस हायकोर्टात धाव घेण्याच्या तयारीत आहे. 


मुंबईत काँग्रेसच्या 29 नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांचे वॉर्ड आरक्षण सोडतीत खालसा झाले आहेत. यामध्ये मुंबई महापालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा, आसिफ झकेरिया, सुफियान वनु , कमरजहाँ सिद्दीकी या मुंबईत काँग्रेसकडून चांगली कामगिरी करणाऱ्या नगरसेवकांचे वॉर्ड अडचणीत सापडले आहेत. यावरून महाविकास आघाडीमध्ये धुसफूस सुरू होण्याची शक्यता आहे. मुंबई महापालिकेत काँग्रेसने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे. तर, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती होण्याची शक्यता आहे. 


मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचे खच्चीकरण केले जात असल्याचा काँग्रेसने केला आहे. वॉर्ड पुर्नरचनेपाठोपाठ वॉर्ड आरक्षण सोडतीतही काँग्रेसवर अन्याय आणि शिवसेनेचा फायदा झाला असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. शिवसेनेकडून जाणिवपूर्वक मुंबईत काँग्रेसची ताकद वाढू नये याकरता प्रयत्न होत आहेत. त्यावर तोडगा काढू असे महापालिकेतील काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी म्हटले. येत्या आठवड्यात मुंबईत काँग्रेसचे चिंतन शिबीर होणार आहे. त्यामध्ये मुंबईतील काँग्रेसचे नेते चर्चा करणार असल्याची माहिती आहे. 


मुंबई महापालिका निवडणुकीची आरक्षण सोडत काढण्यापूर्वी वॉर्ड पुनर्रचना करण्यात आली आहे. मुंबईत याआधी 227 वॉर्ड होते. पुनर्रचनेनंतर आता एकूण वॉर्ड संख्या 236 इतकी झाली आहे. त्यातील 50 टक्के जागा म्हणजे 118 वॉर्ड हे महिलांसाठी राखीव आहेत. तर, अनुसुचित जातीसाठी 15, अनुसुचित जमातींसाठी 2 जागा राखीव आहेत. 


मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी आरक्षण सोडतीत अनेक दिग्गजांच्या वॉर्डमध्ये आरक्षण लागू झाले. त्यामुळे विद्यमान नगरसेवकांना इतर पर्याय शोधावा लागणार आहे. 


कोणत्या दिग्गजांना शोधावा लागणार पर्याय


आधीच ईडी आणि आयकरच्या रडारवर असलेल्या माजी स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांचा वॉर्ड सर्वसाधारण महिला गटासाठी आरक्षित झाला आहे. त्यामुळे यशवंत जाधवांना शेजारच्या भायखळा- काळाचौकी परिसरातल्या अनुसुचित जातीसाठी आरक्षित असलेल्या वॉर्ड क्रमांक 215   मधून निवडणूक लढता येईल.. माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा ९६ प्रभाग देखील सर्वसाधारण महिला म्हणून आरक्षित झाला आहे. शिवसेनेचे आणखी एक दिग्गज असलेले बेस्टचे माजी अध्यक्ष आशिष चेंबूरकर यांचा वॉर्ड अनुसूचित जातीसाठी राखीव झाला आहे. 


राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे निकटवर्तीय समजले जाणारे अमेय घोले यांचा वॉर्डही आरक्षित झाला आहे. काँग्रेसचे महापालिकेतील विरोधी पक्ष नेते रवी राजा यांचा वॉर्ड क्रमांक 182 हा महिला आरक्षित झाला आहे. रवी राजांनाही आजुबाजूच्या वॉर्ड मध्ये शोधाशोध करावी लागणार आहे. मात्र, प्रभाग पुनर्रचनेमुळे सुरक्षित वॉर्ड मिळणं मुश्कील आहे.


मनसेचे एकमेव नगरसेवक संजय तुर्डे यांचा वॉर्ड आरक्षण सोडतीत महिलांसाठी राखीव झाला आहे.


मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांना दिलासा मिळाला आहे. किशोरी पेडणेकर यांचा प्रभाग वॉर्ड क्रमांक 206 हा  सर्वसाधारण गटासाठी निश्चित करण्यात आला आहे. 


 


पाहा व्हिडिओ: मुंबईत शिवसेनेकडून काँग्रेसचं खच्चीकरण, रवी राजा यांचा आरोप