मुंबई : मुंबईहून सुटणाऱ्या दोन लेजेंडरी एक्स्प्रेसचा आज वाढदिवस. एक पंजाब मेल आणि दूसरी डेक्कन क्वीन. पंजाब मेलला आज 110 वर्षे तर डेक्कन क्वीनला 92 वर्षे पूर्ण झाली. 1 जून 1912 ला पंजाब मेल तेव्हाच्या बॅलार्ड पियर स्टेशनवरुन सुटली तर 1 जून 1930 ला डेक्कन क्वीनने आपला पहिला प्रवास सुरु केला. 


या दोन्ही ट्रेन तेव्हाच्या ग्रेट इंडियन पेनिनसुला रेल्वेने सुरु केल्या होत्या. आता आपण जिला मध्य रेल्वे म्हणून ओळखतो. पंजाब मेल तेव्हा मुंबई ते थेट आताच्या पकिस्तानातील पेशावर या शहरापर्यंत धावायची. एकूण 2496 किमीचे अंतर ती 47 तासात पूर्ण करायची. त्यावेळी या गाडीला केवळ 6 डबे असायचे. त्यातील तीनच डबे हे प्रवाशांसाठी होते, ज्यात केवळ 96 प्रवासी असायचे. उर्वरित डबे टपाल आणि माल वाहतूक करायचे. आता हिच गाडी 1930 किमीचा प्रवास 34 तासात करते आणि मुंबई ते फिरोजपुर अशी धावते. 


तर डेक्कन क्वीनचा इतिहास देखील मोठा आहे. डेक्कन क्वीन ही पहिली सुपरफास्ट डिलक्स ट्रेन म्हणून ओळखली जाते. सुरुवातीला तिला केवळ 7 डबे होते. नंतर ते 12 करण्यात आले आणि आता 17 डबे घेऊन ही गाडी धावते. या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे ही भारतातील एकमेव अशी गाडी आहे ज्यात डायनिंग कार आहे, म्हणजेच चालत्या गाडीत हॉटेलसारखे बसून खाण्याची सोय आहे. पुणे-मुंबई-पुणे असा प्रवास करणारी ही गाडी दोन्ही शहरांच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे. कित्येक वर्षे डेक्कन क्वीनने दररोज पुणे-मुंबई-पुणे प्रवास करणारे प्रवासी आहेत. येत्या 22 जून पासून या गाडीचे जुने डबे बाजूला करुन नवीन रंगसंगती आणि सोयी सुविधा असलेले एल एच बी प्रकारातील डबे जोडण्यात येणार आहेत.


अशा या दोन्ही लेजेंडरी गाड्या भारताच्या रेल्वे इतिहासातील मानबिंदू आहेत. मुख्य म्हणजे मुंबई आणि महाराष्ट्राच्या विकासाला, सांस्कृतिक जडणघडणीला कारणीभूत आहेत. त्यामुळे प्रवासी आणि रेल्वेप्रेमी देखील मोठ्या उत्साहात या दोन्ही गाड्यांचे वाढदिवस साजरे करतात.


पुणे स्थानकावर केक कापून डेक्कन क्वीनचा बर्थडे सेलिब्रेट
पुणे रेल्वे स्थानकावर आज सकाळी केक कापून डेक्कन क्वीन एक्स्प्रेसचा वाढदिवस साजरा करण्यात आला. प्रथेप्रमाणे रेल्वे प्रवासी संघाच्या वतीने मोठ्या उत्साहात केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. कोरोनामुळे सलग दोन वर्षे वाढदिवसाला डेक्कन क्वीनचा रेक मुंबई यार्डातच होता. यावेळी इंजिनचं पूजन करत चालकाचा सत्कार देखील करण्यात आला आणि त्यानंतर ही गाडी मार्गस्थ झाली. यावेळी विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, अभिनेत्री नेहा हिंगे, रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा, पुणे स्टेशनचे संचालक एस सी जैन यांच्या सह रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि प्रवासी उपस्थित होते.