मुंबई : मुंबई महानगरपालिकेचा 2022-23 या वर्षाचा अर्थसंकल्प 3 फेब्रुवारी रोजी महानगर पालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल स्थायी समितीला सादर करणार आहेत. या अर्थसंकल्पात आरोग्य विभागासाठी भरघोस तरतूद होण्याची शक्यता आहे. तसेच,निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर थेट करवाढ होण्याची शक्यता कमी असली महापालिकेकडून पुरवल्या जाणाऱ्या सेवांच्या शुल्कात वाढ करण्याची शिफारस केली जाऊ शकते.


महानगरपालिकेचा 2021-22 या वर्षाचा अर्थसंकल्प 39 हजार 38 कोटी रुपयांचा होता. यात आगामी वर्षासाठी सात ते आठ टक्क्यांची वाढ होण्याची शक्यता आहे. महानगरपालिकेचे वरळी ते नरीमन पॉईंट पर्यंतचा कोस्टल  रोड , मुलूंड गोरेगाव जोड रस्ता, समुद्राचे पाणी गोडे करणारे असे महत्वाकांक्षी प्रकल्प आहेत.यात कोस्टल रोडचे काम सध्या सुरु आहे.


तर,समुद्राचे पाणी गोडे करण्याचा प्रकल्पाचे काम पुढल्या आर्थिक वर्षात सुरु होण्याची शक्यता आहे. तर, मुलूंड, गोरेगाव जोड रस्त्यातील भुयारी मार्गाचे कामही पुढल्या आर्थिक वर्षात सुरु होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकल्पांसाठी अर्थसंकल्पात भरीव तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर काही दिवसांपुर्वीच रस्ते दुरुस्तीच्या दोन हजार कोटीहून अधिकच कामांना मंजुरी देण्यात आली आहे. त्याच्यासाठीही अर्थसंकल्पात तरतूद केली जाईल. पुलांच्या दुरुस्तीवरही खर्च केला जाणार आहे.


कोविड काळातील अनुभवानंतर आरोग्य विभागासाठी आगामी अर्थसंकल्पात भरघोस तरतूद केली जाणार आहे. दवाखान्यांच्या विस्तारासह उपनगरीय रुग्णालयाच्या विस्तारासाठी मोठी तरतूद केली जाणार आहे. यात मुलूंड येथील अगरवाल, विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालय, गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयांच्या विस्तारावर प्रामुख्याने भर दिला जाणार आहे.तसेच, प्रसुतीगृहांसाठीही विशेष तरतूद केली जाण्याची शक्यता आहे. 


महत्त्वाच्या बातम्या: