मध्य प्रदेश : भैय्यू महाराज (Bhaiyyu Maharaj) यांच्या आत्महत्येप्रकरणी मध्य प्रदेशातील इंदूर न्यायालयात शुक्रवारी अंतिम सुनावणी पार पडली. न्यायालयाने विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाकडून शिक्षा सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी दोषी तिघांना न्यायालयाने प्रत्येकी सहा वर्षांची शिक्षा दिली आहे. न्यायालयाने आदेश देताना म्हटले की, भैय्यू महाराज यांचा सेवकांनी इतका छळ केला की त्यांनी आत्महत्या केली. 12 जून 2018 रोजी भैय्यू महाराज यांनी स्वत:ला गोळी घालून आत्महत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, साडेतीन वर्षांच्या सुनावणीनंतर सत्र न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला. उच्च न्यायालयाने हा गुन्हा सिद्ध केला आहे.


भैय्यू महाराजांच्या आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांनी भैय्यू महाराजांचे सेवक शरद देशमुख, विनायक दुधाळे आणि पलक पुराणिक यांना शिक्षा सुनावली. आरोपी पैशासाठी महाराजांचा छळ करत असे, हे न्यायालयाने मान्य केले. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेलही करण्यात आले. भैय्यू महाराजांना कुटुंबापेक्षा सेवेकऱ्यांवर अधिक विश्वास होता की त्यांनी त्यांचे आश्रम आणि काम सेवकांकडे सोपवले होते, त्याच सेवेकऱ्यांनी त्यांना पैशासाठी एवढा त्रास दिला की त्यांना आत्महत्येसारखे पाऊल उचलावे लागले.


याप्रकरणी 19 जानेवारीला साडेपाच तास सुनावणी झाली. यात भैय्यू महाराज आत्महत्या प्रकरणाचा निकाल 28 जानेवारीला सुनावण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले होते. महाराजांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याबद्दल त्यांचे सेवक विनायक, शरद आणि पलक बराच काळ तुरुंगात आहेत. अतिरिक्त सत्र न्यायाधीश धर्मेंद्र सोनी यांच्या न्यायालयात दोन सत्रांत साडेपाच तास सुनावणी झाली.


आरोपी विनायकच्या वतीने अ‍ॅड. आशिष चौरे यांनी युक्तिवाद केला. यापूर्वी दोन आठवडे सरकारच्या वतीने शरद आणि विनायक यांच्यात अंतिम चर्चा झाली होती. महाराजांनी स्वत:वर गोळी झाडण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये ट्रस्टची जबाबदारी विनायकवर सोपवण्यात आली होती, त्यांच्या नावावर संपत्ती नव्हती, असा युक्तिवाद विनायकच्या वकिलाने केला. त्यामुळेच त्याला गोवण्यात आले आहे. घटनेच्या काही दिवसांपूर्वी भय्यू महाराज पुण्याला जात होते. त्यांना वारंवार कोणाचे तरी फोन येत होते, त्याचाही पोलिसांनी योग्य तपास केला नाही, अन्यथा योग्य आरोपी सापडला असता, असेही वकिलांनी म्हटले. यापूर्वी शरदचे वकील धर्मेंद्र गुर्जर यांनी दोन दिवसांत 10 तास तर पलकचे वकील अविनाश सिरपूरकर यांनी पाच दिवस युक्तिवाद केला होता. या खटल्यात 30 हून अधिक साक्षीदारांचे जबाब घेण्यात आले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha