Congress on Amaravati violence : महाराष्ट्रातील अमरावती, नांदेड, मालेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या मुद्यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यात विधानसभेच्या निवडणुका लवकरच होत आहे. दंगली पेटवून निवडणुकीत त्याचा फायदा घेण्याचा भाजपाचा नेहमीप्रमाणे डाव आहे. म्हणूनच त्रिपुरा घटनेच्या आडून महाराष्ट्रात दंगली पेटवून त्यावर उत्तर प्रदेशात आपली राजकीय पोळी भाजण्याचे भाजपाचे षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि शांतता बाळगण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. 


शुक्रवारपासून अमरावतीसह राज्यात काही भागात घडलेल्या हिंसक घटनांचा तीव्र निषेध करून नाना पटोले म्हणाले की, महाराष्ट्रात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना यांचे सरकार दोन वर्षापासून स्थिर असून भाजपाने हे सरकार अस्थिर करण्यासाठी खूप प्रयत्न केले पण यात त्यांना यश आले नाही. महाराष्ट्रात अशांतता पसरवून सरकार पाडण्याचे सर्व प्रकारचे उद्योग झाले त्यात महागाई, बेरोजगारी, ढासळती अर्थव्यवस्था, चीनची घुसखोरी, शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून देशभर भारतीय जनता पक्षाच्याविरोधात तीव्र असंतोष आहे. या मुख्य मुद्यापासून जनतेचे लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाजपाकडून असे षडयंत्र केले जात आहे. हिंसक कारवाया करणाऱ्यांवर व अफवा पसरवणाऱ्यांवर सरकारने कारवाई करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली. 


समाजातील दोन घटकांमध्ये तेढ निर्माण करुन त्यावर आपली राजकीय पोळी भाजण्याचे राजकारण करणे हा भारतीय जनता पक्षाचा इतिहास राहिला आहे. देशातील ज्वलंत प्रश्नावर जनतेच्या आक्राशोला त्यांना तोंड देता येत नाही. तर जनतेमध्ये भाजपा व मोदी सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. या असंतोषाचा फटका उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील आगामी विधानसभेच्या निवडणुकीत बसू नये म्हणून दंगली पेटवून मतांचे ध्रुवीकरण करण्याचा भाजपाचा डाव असल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला. 


सामान्य जनतेला वेठीस धरू नये - यशोमती ठाकूर
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी  म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.


संबंधित वृत्त :


Curfew in Amravati : धुमसत्या अमरावतीत संचारबंदी लागू, INI CET चं काय होणार?


Amravati violence Update : अमरावतीत बंदला हिंसक वळण, दगडफेकीनंतर पोलिसांकडून जमावावर लाठीचार्ज