Maharashtra Amravati violence Update : त्रिपुरातील (Tripura Violence)घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या काही भागात उमटले आहेत. यात अमरावतीमध्ये वातावरण खूप तणावाचे झाले असून आक्रमक आंदोलकांनी या दुकानांवर दगडफेक करत तोडफोड केली. यानंतर कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनीही आक्रमक पवित्रा घेत दगडफेक करणाऱ्यांवर लाठीचार्ज केला. काल मालेगाव, नांदेड, अमरावती, भिवंडी येथे मुस्लिम समाजानं मोर्चे काढले. ठिकठिकाणी निघालेल्या मोर्चांना हिंसक वळण लागल्याचं पाहायला मिळालं. मोर्चादरम्यान मालेगाव, नांदेड, अमरावतीत झालेली तोडफोड कॅमेऱ्यात कैद झाली असून सध्या तणावपूर्ण शांतता आहे. राज्यात काही ठिकाणी जाळपोळ, दगडफेकीच्या घटना घडल्या आहेत. या घटनेच्या निषेधार्थ काही ठिकाणी बंद पुकारण्यात आला आहे.
Maharashtra Protest Live UPDATES : त्रिपुरातील हिंसाचारांनंतर महाराष्ट्रात तणाव, वाचा प्रत्येक अपडेट
मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त
अमरावतीत बंदच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. राज्य राखीव पोलीस दलही चौकाचौकात तैनात करण्यात आलं. काही आंदोलकांकडून बंद दुकानांची कुलुपं तोडून तोडफोड करत असल्याचं व्हिडीओंद्वारे स्पष्ट झालं आहे. नागपूरचे पोलीस महासंचालक संदीप पाटील हे अमरावतीत दाखल झाले आहेत. त्यांनी या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत.
अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे की, कोणीही सामान्य जनतेला वेठीस धरू नये. अमरावतीच्या घटनेची सखोल चौकशी होईल. याला कोणीही राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करू नये. सर्वांनी शांतता राखावी. तर गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर राज्यातील जनतेला शांतता व संयम राखण्याचे आवाहन केले आहे. राज्य सरकार पूर्णपणे परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. तसेच गृहमंत्री स्वतः वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांमार्फत परिस्थितीवर देखरेख ठेवून आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. संयम बाळगावा असे आवाहन गृहमंत्र्यांनी केले आहे.
नांदेड, यवतमाळ, भिवंडी, मालेगावमध्येही तनाव
त्रिपुरा राज्यात मुस्लिम समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराच्या विरोधात काढण्यात आलेल्या रॅलीला हिंसक वळण लागलं आहे. नांदेड शहरात काल मुस्लिम समाजानं काढलेल्या मोर्च्याला हिंसक वळण लागलं. शहरातल्या शिवाजीनगर, केळी मार्केट, देगलूर नाका परिसरात तुफान दगडफेक झाली. दगडफेकीत 2 पोलीस कर्मचारी गंभीर जखमी झालेत. काल यवतमाळ जिल्ह्यातल्या पुसदमध्ये मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाच्या वेळी एका युवकाला मारहाण करण्यात आली. तसंच आंदोलकांकडून एका दुकानातही मारहाणीची घटना घडली. ही सर्व घटना सीसीटीव्हीत कैद झाली. मालेगावातही त्रिपुरातल्या घटनेच्या निषेधार्थ मुस्लिम समाजानं बंद पाळला होता. या बंदलाही गालबोट लागलं आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी मोठा जनसमुदाय निघाला होता. यावेळी काही ठिकाणी जमावानं दगडफेक केली. भिवंडीतही काल मुस्लिम समाजानं बंद पुकारला होता. मात्र शहरातील प्रभुआळी मंडई, बाजारपेठ या भागात दुकान बंद न झाल्याने एका मोटारसायकलवर आलेल्या टोळीने व्यापाऱ्यांची जबरदस्ती दुकान बंद करण्याचा प्रयत्न केला त्यामुळे व्यापाऱ्यांनी विरोध करून पोलिसांना माहिती देताच या टोळीने घटनास्थळावरून पळ काढला.
अशोक चव्हाण यांचे शांततेचे आवाहन
त्रिपुरा घटनेच्या निषेधार्थ आंदोलनात महाराष्ट्रात काही ठिकाणी तोडफोड झाल्याच्या पार्श्वभूमिवर सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी खंत व्यक्त करून शांततेचे आवाहन केले आहे. याबाबत प्रतिक्रिया व्यक्त करताना ते म्हणाले की, त्रिपुरातील घटनेच्या निषेधार्थ आज देशभरात अनेक ठिकाणी आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्रात काही ठिकाणी दगडफेक, वाहनांची तोडफोड असे प्रकार घडले आहेत. निषेध नोंदवण्याचा अधिकार सर्वांना आहे. मात्र त्यासाठी हिंसाचाराचा अवलंब करणे चुकीचे आहे. या घटनांची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल. नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये व शांततेचे पालन करावे, असेही आवाहन अशोक चव्हाण यांनी केले.
बांग्लादेशमध्ये काय घडलं?
ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात दुर्गापूजेदरम्यान बांग्लादेशात हिंसाचार झाला. बांग्लादेशातील चांदपूर, कमिला जिल्ह्यांमध्ये दुर्गापूजेदरम्यान तोडफोड करण्यात आली. दुर्गापूजा स्थळावर कुराण आढळल्याच्या आणि कुराणाचा अपमान झाल्याच्या कथित प्रकरणानंतर हिंसाचार सुरु झाला. त्यानंतर चांदपूरमधील हाजीगंज, चट्टोग्राममधील बंशखली, चपैनवाबगंज, काक्स बाजार या परिसरात घरांची, मंदिरांची तोडफोड करण्यात आली. या हिंसाचारात काही जणांचा मृत्यू झाला. अनेक नागरिक जखमी झाले.
बांग्लादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये मोर्चे
बांग्लादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषदेनं मोर्चे काढले. या मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि घरांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली. त्यानंतर सोशल मिडीयावर या तोडफोडीचे व्हिडीओ काही समाजकंटकांकडून व्हायरल करण्यात आले. या हिंसेप्रकरणी 102 सोशल मिडीया यूजर्स विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.