मुंबई : भाजप (BJP) नेते आशिष शेलार ( Ashish Shelar) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. वांद्रे  येथील त्यांच्या कार्यालयात धमकीचे निनावी पत्र आले आहे. तुकडे-तुकडे करून जीवे मारण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीने पाठवलेलं पत्र आज वांद्रे येथील शेलार यांच्या कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये मिळाले. हे पत्र मिळाल्यानंतर अज्ञात व्यक्तीविरोधात वांद्रे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


वांद्रे येथील कार्यालयाच्या लेटर बॉक्समध्ये आलेलं पत्र हस्तलिखित असून या पत्रात आशिष शेलारांसह भाजप आणि शिंदे गटाच्या विरोधात असभ्य भाषेचा वापर करण्यात आला आहे. या पत्रात आक्षेपार्ह भाषेत काही मजकूर लिहिलेला असल्याची माहिती मिळाली आहे. 


Ashish Shelar : आशिष शेलारांकडून लेखी तक्रार


दरम्यान, धमकीचे पत्र आल्यानंतर आशिष शेलार यांनी वांद्रे पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात लेखी तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या पत्रासंदर्भात तपास सुरू केला आहे.


दरम्यान, गेल्या काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना खंडणीसाठी फोन आला होता. तीन वेळा संबंधित आरोपीने गडकरी यांना फोन केला होता. पोलिस तपासानंतर हा फोन बेळगाव तुरूंगातून करण्यात आल्याचे समोर आले होते. ही घटना ताजी असतानाच   आता आशिष शेलार यांना धमकीचे पत्र आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. 


Ashish Shelar : काय म्हटलं आहे पत्रात?


आशिष शेलार यांना आलेलं हे पत्र निनावी आहे. या पत्रात जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असून मुंबईतील चौपाटीमध्ये फेकून देणार. हातपाय तोडणार आणि कुटुंबीयांनाही संपवणार असा आशय या धमकीमध्ये आहे.


Ashish Shelar : वर्षात दुसऱ्यांदा धमकी 


दरम्यान, यापूर्वी देखील आशिष शेलार यांना धमकी देण्यात आली होती.  जानेवारी 2022 मध्ये आशिष शेलार यांना धमकीचा फोन आला होता. फोनवरून त्यांना असभ्य शब्दात शिविगाळ करण्यात आली होती. त्यावेळी देखील त्यांच्या कुटुंबीयांनाही धमकावण्यात आले होते. त्यावेळी आशिष शेलार यांनी त्यावेळी मुंबई पोलिस आयुक्तांकडे याबाबतची  तक्रार केली होती. त्यानंतर आता देखील जानेवारी महिन्यातच त्यांना दुसऱ्यांदा धमकी आली आहे. त्यामुळे पोलिस याबाबत कसून तपास करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या


एटीएम कार्ड बदलून पैसे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, धुळ्यातील शिरपूर पोलिसांनी चौघांना ठोकल्या बेड्या