Maharashtra Political Crisis : राज्यात अडीच वर्षापूर्वी महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच हे सरकार पडावे यासाठी सातत्याने देव पाण्यात घालून बसलेल्या भाजपला एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडखोरीने आयतीच संधी चालून आली आहे. बंडाळी नाट्याला भाजपने संपूर्ण रसद पडद्यामागून पुरवली असली, तरी पडद्यावरून मात्र नेते गायब झाले आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे गुवाहाटी व्हाया सुरत पोहोचल्यानंतर आपल्या सागर या शासकीय निवासस्थानी मी पुन्हा येईन हा नारा सत्यात उतरवण्यासाठी रणनीती आखत आहेत.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सावध भूमिकेमध्ये असलेल्या भाजपने आता प्रत्यक्ष डाव टाकण्यास सुरुवात केली आहे. यातील पहिला भाग म्हणजेच त्यांनी भाजपला पाठिंबा दिलेल्या अपक्षांची विधिमंडळात सहयोगी म्हणून नोंदणी करून घेण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. या रणनीतीचा फायदा त्यांना बहुमत ठरावावेळी होऊ शकतो. त्यामुळे भाजपकडून सत्ता स्थापन करण्याच्या दिशेने पावले टाकण्यास सुरवात केल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन
दुसरीकडे दुसरीकडे शिवसेना आणि बंडखोर एकनाथ शिंदे यांच्या गटाकडून शक्तीप्रदर्शनाचे काम सुरुच आहे. आज शिंदे गटाकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आले. याचा एक व्हिडिओ समोर आला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अपक्षांसह 42 आमदार असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. शिवसेनेकडून आज बोलावण्यात आलेल्या बैठकीत 17 आमदार उपस्थित होते.
दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज नाराज आमदारांना थेट आवाहन करताना महाविकास आघाडी सरकारमधून बाहेर पडायला तयार आहोत, पण पहिल्यांदा मुंबईमध्ये या, आपण चर्चा करू असे म्हटले आहे. मात्र, बंडखोर शिंदे गटाकडून कोणताही प्रतिसाद देण्यात आलेला नाही.
मुख्यमंत्र्यांकडूनही बंडखोर आमदारांना आवाहन
संजय राऊत यांनी सरकारमधून बाहेर पडण्याबाबत विचार करू असे म्हटल्यानंतर राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बंडखोर शिवसेना आमदारांना पुन्हा राज्यात परतण्याचे आवाहन केले होते. प्रत्यक्ष भेटून चर्चा करावी असे आवाहन त्यांनी केले होते. शिवसेना आमदारांना दुसरा मुख्यमंत्री हवा असेल तर त्यालाही आपण तयार असून मात्र, त्यासाठी ती मुख्यमंत्रीपदाची व्यक्ती शिवसैनिकच असावी असे म्हटले होते.
उद्धव ठाकरे यू टर्न घेतील वाटत नाही
संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे यू टर्न घेतील, असे मला वाटत नाही. मात्र, त्यांना भूमिका घेण्याचा अधिकार आहे. आमच्या हातात काहीच नसल्याचे ते म्हणाले. त्यामुळे कोणती भूमिका घ्यायची हा त्यांचा वैयक्तिक प्रश्न असल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचबरोबर चव्हाण यांनी मुख्यमंत्री यू टर्न घेतील याचे आश्चर्य आहे. स्वत: लाईव्ह येऊन सांगितल्यास योग्य होईल. शिंदे गटाकडून आमदारांचा फोटो समोर आल्यानंतर त्यांनी दबावाखाली भूमिका घेतली आहे का? हे स्पष्ट नसल्याचे ते म्हणाले.
इतर महत्त्वाच्या बातम्या