मुंबई: शिवसेनेच्या एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे एकीकडे राजकीय वातावरण तापलं असताना दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं आहे. अजित पवार हे काँग्रेसच्या आमदारांना त्रास द्यायचे, निधी देत नसत असं नाना पटोले यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितलं. 


शिवसेनेतील एकनाथ शिंदे यांच्या बंडावर प्रतिक्रिया देताना नाना पटोले म्हणाले की, "अजित पवार हे आपल्याला निधी देत नाहीत, त्रास देतात अशा प्रकारच्या तक्रारी शिवसेनेच्या आमदारांकडून करण्यात आल्या, तशाच तक्रारी काँग्रेसच्या आमदारांनीही आपल्याकडे केल्या होत्या असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यानंतर मी शरद पवार आणि अजित पवारांना भेटलो आणि त्यासंबंधीचा भूमिका स्पष्ट केली असल्याचंही त्यांनी म्हटलं."


काँग्रेस पूर्ण ताकतीने शिवसेनेच्या मागे उभी राहिल असं नाना पटोलेंनी स्पष्ट केलं. ते म्हणाले की, "आम्हाला सत्तेचा कोणताही मोह नाही, त्यामुळे जनेतेसाठी आम्ही लढत राहू. महाविकास आघाडीसोबत काँग्रेस राहिल. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर नाही तर ईडीच्या भीतींमुळे बंडखोर आमदांरांनी हे पाऊल उचललं असून त्यामागे भाजप आहे. हे सरकार पाच वर्षे चालेल. भाजप सत्तेसाठी कोणत्या थराला जातं हे देशातील जनतेला पाहू द्या."


प्रत्येक पक्षाला आपली स्ट्रॅटेजी तयार करण्याचा अधिकार आहे. मागील सरकारच्या काळातही शिवसेना मंत्री खिशात राजीनामा घेऊन फिरत होते. आताही तसंच काहीसं घडतंय. महाविकास आघाडीत आम्ही आहोत. जर शिवसेनेने काही निर्णय घेतला तर आम्ही तयार आहेत. जर काही वेगळा विचार झाला तर आम्ही विरोधी पक्षात बसायला तयार आहोत. 


दरम्यान, राज्यातील राजकीय घडामोडीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसची सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक होत आहे. शिवसेनेच्या भूमिकेसंदर्भात काँग्रेसने काय भूमिका घ्यायची यावर या बैठकीत चर्चा होणार असल्याचं समजतंय. या बैठकीसाठी  काँग्रेसचे प्रभारी एच के पाटील उपस्थिती राहणार आहेत.