मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा आज (27 जुलै) वाढदिवस आहे. शिवसेनेचे युवा नेते म्हणून राजकारणात पाऊल टाकणारे उद्धव ठाकरे यांनी आज वयाची साठी पूर्ण केली आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांचा आज पहिलाच वाढदिवस आहे.


आपले वडील आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी केली आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. बाळासाहेब ठाकरे हे मराठी कायमच मराठी आणि हिंदुत्त्वाचे पुरस्कर्ते राहिले, परंतु महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर शिवसेनेची वाटचाल आता हार्डकोर हिंदुत्त्वाऐवजी 'सर्वधर्म'च्या दिशेने सुरु आहे. शिवाय उत्तर भारतीयांबाबतचा दृष्टीकोनही बदलला आहे.

पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा : मुख्यमंत्री
यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्र्यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसंच कार्यालक किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नता. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. तसंच कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

उद्धव ठाकरे यांचा जन्म 27 जुलै 1960 रोजी झाला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात असेपर्यंत उद्धव ठाकरे सक्रिय राजकारणापासून तसे दूरच होते आणि पक्षाचं मुखपत्र सामनाचं कामकाज पाहत होते. शिवाय सामनाचे संपादकही होते. 2000 मध्ये तब्येतीच्या कारणांमुळे बाळासाहेब ठाकरे राजकारणापासून दूर गेल्यानंतर उद्धव ठाकरे यांनीच पक्षाचं कामकाज पाहायला सुरुवात केली.


2003 मध्ये शिवसेनेचे कार्याध्यक्ष
उद्धव ठाकरे यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीतील पहिलं यश मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत पाहिलं. 2002 मध्ये मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला मोठं यश मिळालं. यानंतर 2003 मध्ये त्यांच्यावर शिवसेनेचे कार्यध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपवण्यात आली. राजकारणात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना कौटुंबिक आणि पक्षा या दोन्ही आघाड्यांवर लढावं लागलं.


बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेनेचा उत्तराधिकारी कोण? यासाठी उद्धव ठाकरे यांना आपले चुलत बंधू राज ठाकरे यांच्यासोबतही लढावं लागलं. शिवाय पक्षातील एका गटाच्या विरोधाही सामना करावा लागला. महाराष्ट्रात शिवसेनेचं राजकीय अस्तित्त्व टिकवण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भाजपशीही दोन हात करावे लागले. शिवसेना-भाजप हे हिंदूत्त्ववादी विचारधारेमुळे 25 वर्षे सोबत होते. पण 2019 मध्ये शिवसेनेने भाजपशी पुन्हा काडीमोड घेतला आणि वैचारिक विरोधक असलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत हातमिळवणी करत सरकार स्थापन केलं.


गाडीचं स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती; मुख्यमंत्र्यांना  वाढदिवसाच्या शुभेच्छा देत सूचक फोटो ट्वीट




पक्षावर मजबूत पकड
उद्धव ठाकरे कायमच पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या संपर्कात असतात. मंत्र्यांपासून शाखेतल्या शिवसैनिकांपर्यंत उद्धव ठाकरे यांचा संपर्क असता. राज्यातील ग्राऊंड लेवलला जाऊन ते आपला पक्ष अधिक मजबूत करण्यासाठी प्रयत्नशील असतात. उद्धव ठाकरे उग्र राजकारणावर विश्वास ठेवत नाहीत. 2006 मध्ये शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे उत्तर भारतीयांविरोधात आंदोलन करुन आपल्या राजकारणाला धार देण्याचा प्रयत्न केला. परंतु उद्धव ठाकरे यांनी हळूहळू राजकारणावरील पकड आणखी मजबूत केली.


फोटोग्राफर उद्धव ठाकरे
वडील बाळासाहेब ठाकरे आणि चुलत बंधू राज ठाकरे हे व्यंगचित्रकार आहेत तर उद्धव ठाकरे हे उत्तम फोटोग्राफर आहेत. उद्धव ठाकरे यांचा स्वभाव प्रेमळ, शांत आणि संयमी आहे. जंटलमन पॉलिटिशियन अशी जनमानसात त्यांची ओळख बनली आहे. बाळासाहेब ठाकरे आपल्या सडेतोड वक्तृत्त्व आणि व्यंगचित्रासाठी ओळखले जातात तर उद्धव ठाकरे यांना फोटोग्राफीचा छंद आहे.


लोकप्रिय मुख्यमंत्र्यांमध्ये समावेश
उद्धव राजकारणात अशाप्रकारे आपल्या वडिलांचा वारसा सांभाळतील यांची फारच कमी लोकांना अपेक्षा होती. मुख्यमंत्रीपदी विराजमान होऊन आता आठ महिने होते. मुख्यमंत्रीपदाच्या या कार्यकाळात त्यांच्यासमोर कोरोना महामारी आणि निसर्ग चक्रीवादळाच्या रुपाने नैसर्गिक संकटं आली. निसर्ग चक्रीवादळचा नेटाने सामना केला तसंच कोरोनाशीही धीराने सामना सुरु आहे. त्यामुळेच अगदी सेलिब्रिटींपासून सामन्यांमध्ये ते लोकप्रिय बनले आहेत.