मुंबई : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सुरक्षित अंतर हा एकमेव पर्याय सध्या आहे. वाढत्या कोरोनाच्या संसर्गामुळे डॉक्टरांची मोठी कसरत होताना दिसत आहे. देशभरात रुग्ण तपासणी करताना डॉक्टरांना कोरोनाची बाधा झाली. त्याचं प्रमुख कारण म्हणजे डॉक्टर आणि रुग्ण यांचा संपर्क. अशा वेळेस रूग्णाची तपासणी करतांना स्टेथोस्कोप यंत्रामुळे कोरोनाची बाधा होण्याचा धोका अधिक असतो. कारण अगदी जवळून तपासणी करण्याच एकमेव यंत्र म्हणजे स्टेथोस्कोप आहे. मात्र स्टेथोस्कोपचा वापर इलेक्ट्रॉनिक पद्धतीने करण्याची किमया करून दाखवली आहे ते वाशीमच्या प्रा. सत्यनारायण भड यांनी.
वाशिमच्या लाखांळा भागात प्रा. सत्यनारायण भड राहतात. भड हे वाशीमच्या शासकीय तंत्रनिकेतनमध्ये इलेक्ट्रॉनिक विषयाचे धडे देणारे प्राध्यपक. मात्र सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांनी अनेक यंत्र तयार केली. विशेष म्हणजे अपारंपरिक उर्जास्त्रोतावर भड यांनी काम केले. या कामाबद्दस त्यांना केंद्र सरकार आणि राज्य सरकार कडून सन्मानीत करण्यात आले. कोरोनाच्या काळात जो तो आपापल्या पद्धतीने समाजासाठी योगदान देत आहे. अशा वेळेस वाशीमचे डॉ .अरुण बिबेकर यांना रूग्ण तपासणी करताना मोठ्या अडचणी येत होत्या त्या वेळेस बिबेकर यांनी असं काही करता येऊ शकते का? याचा शोध सुरु केला. त्यांना एका इलेक्ट्रॉनिकच्या दुकान चालकाकडून प्रा. सत्यनारायण भड याचं नाव सुचविण्यात आले. डॉ. बिबेकर यांच्या संकल्पनेतून सत्यनारायण भड यांनी वायरलेस स्टेथोस्कोप यंत्र आणि रूग्णा पासून सुरक्षित अंतर ठेवून आरोग्य तपासणी करण्यासाठी स्टेथोस्कोप बनवून वैद्यकीय क्षेत्राला मोठा दिलासा दिला आहे.
प्रा .भड म्हणाले, माझी इलेक्ट्रॉनिक विषयामध्ये विविध प्रयोगावर असलेली पकड आणि डॉ. बिबेकर यांच्या मार्गदर्शना यामुळे स्टेथोस्कोप करणे शक्य झाले. सध्या रुग्ण आणि डॉक्टरांसाठी काही तरी करण्याच्या मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं याचं समाधान आहे. पैसा कमविणे किंवा प्रसिद्धी मिळवणे हा उद्देश नाही तर समाजात काम करणाऱ्या खऱ्या योद्धांना मदत करणे हा उद्देश होता. डॉ. बिबेकर यांनी फ्रिक्वेन्सी बाबत माहिती दिल्यानंतर हे यंत्र विकसीत करण्यात आले आहे. यंत्राची किंमत तीन हजार रुपये आहे. यंत्राची किंमत कमी कशी करता येईल यावर प्रयोग सुरू आहे.
कोरोना काळात रुग्ण तपासणी करणे अत्यंत कठीण होत चाललं होत. स्टेथोस्कोप तपासणी यंत्र लहान असल्याने संपर्क येत होता त्यामुळे कोरोनाबाधित होण्याचा धोका वाढत आहे . डॉक्टरांच्या सुरक्षेसाठी तंत्रज्ञानाचा वापर करून काही करता येईल का? असं डोक्यात आले. प्रा. भड यांच्यासोबत या बाबत चर्चा केली. हा स्टेथोस्कोप मेडिकल क्षेत्रासाठी नवीन प्रयोग असल्याचे डॉ. बिबेकर म्हणाले.