मुंबई :  महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  यांचा आज 60वा वाढदिवस आहे. मुख्यमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतरचा उद्धव ठाकरे यांचा हा पहिलाच वाढदिवस आहे. कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा वाढदिवस साजरा न करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना त्याच्या वाढदिवसाच्या निमित्तानं सर्वच स्तरांतून शुभेच्छा देण्यात येत आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अनोख्या अंदाजात सूचक फोटो ट्वीट करत मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यरात्री बारा वाजताच मुख्यमंत्र्यांबरोबरचा फोटो शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. फोटोत उद्धव ठाकरे आणि अजित पवार एकाच इलेक्ट्रीक वाहनामध्ये बसलेले दिसत आहेत. पण यातली सूचक गोष्ट म्हणजे महाराष्ट्राचे स्टेअरिंग उद्धव ठाकरेंच्या हाती असले, तरी फोटोत मात्र गाडीचे स्टेअरिंग अजित पवारांच्या हाती दिसत आहे.


“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री, शिवसेनेचे पक्षप्रमुख, महाविकास आघाडीचे नेते सन्माननीय श्री. उद्धवजी ठाकरे साहेबांच्या हिरकमहोत्सवी वाढदिवसानिमित्तानं त्यांचे मन:पूर्वक अभिष्टचिंतन! त्यांना निरोगी व दिर्घायुष्य लाभो, अशी प्रार्थना करतो. उद्धवजींच्या समर्थ, कुशल नेतृत्वाखाली कोरोनाविरुद्ध सुरु असलेला लढा आपण निश्चितंच जिंकू तसंच पुरोगामी, प्रगत विचारांच्या महाराष्ट्राला पुन्हा एकदा देशातील व जगातील अव्वल राज्य बनवू, असा मला विश्वास आहे”, अशा शुभेच्छा अजित पवार यांनी दिल्या आहेत.

दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संजय राऊत यांनी घेतलेल्या मुलाखतीत राज्यात तीन चाकी सरकार असलं तरी या सरकारचं स्टेअरिंग माझ्याच हातात आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. विरोधक या सरकारला तीन चाकं, तीन चाकं म्हणून संबोधताय, पण ही तीन चाकं चालताहेत ना एका दिशेने मग तुमच्या पोटात का दुखतंय असा टोलाही त्यांनी लगावला

अर्थात या मुलाखतीतील सरकारचं स्टेअरिंग माझ्याच हातात, असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं वक्तव्य आणि आज मुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देण्यासाठी अजित पवारांनी वाहनाचं स्टेअरिंग आपल्या हाती असलेला फोटो शेअर करणं हे राज्याच्या राजकारणात खूप काही सूचित करतं असल्याचं बोललं जात आहे.

महाविकास आघाडीची राज्यात असणारी सत्ता आणि त्यामध्ये राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस या पक्षांच्या भूमिका पाहता अजित पवारांनी पोस्ट केलेला हा फोटो यावर आता राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहे. त्यामुळे आता पुन्हा एकदा राज्यातील राजकीय परिस्थीती आणि महाविकास आघाडीतील कुरबूरी आता चर्चेचा विषय ठरत आहे हे मात्र नाकारता येणार नाही.

VIDEO | Uddhav Thackeray | तीन चाकी सरकारचं स्टेअरिंग माझ्याच हाती;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत



अजित पवार, फडणवीसांचाही वाढदिवसही साधेपणाने

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचाही 22 जुलै रोजी वाढदिवस झाला. करोनाची परिस्थिती लक्षात घेऊन दोन्ही नेत्यांनी कोणत्याही सोहळ्याशिवाय हा वाढदिवस साजरा केला. तसं आवाहन त्यांनी आधीच केलं होतं. हितचिंतकांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा दिल्या.

... म्हणून मी मंत्रालयात जात नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे