मुंबई : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दररोज नवनवी माहिती समोर येत आहे. त्यातच तपासावरुन मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस यांच्यातील संघर्षही वाढल्याचं चित्र आहेत. आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी पहिल्यांदाच माध्यमांसमोर येऊन तपास योग्य दिशेने सुरु असल्याचं म्हटलं आहे. तसंच बिहार पोलिसांनी ही केस आमच्याकडे ट्रान्सफर करायला हवी होती, असंही परमबीर सिंह म्हणाले. मुंबईत एबीपी माझाशी त्यांनी संवाद साधला.


परमबीर सिंह म्हणाले की, "मुंबई पोलिसांनी आधीच अपघाती मृत्यूची नोंद करुन तपास सुरु केला आहे. फॉरेन्सिक एक्सपर्ट, डॉक्टरांच्या टीमचा सल्ला घेतला आहे. आतापर्यंत 56 जणांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसंच 13 आणि 14 जूनचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फूटेजही आम्ही जप्त केले आहेत. परंतु पार्टी झाल्याचा एकही पुरावा आम्हाला मिळालेला नाही. सखोल तपास सुरु आहे परंतु पोलीस निष्कर्षावर पोहोचलेले नाहीत. नैसर्गिक मृत्यू आणि संशयास्पद मृत्यू या दोन्ही बाजूने तपास केला जात आहे. सुशांत सिंह राजपूत यांच्या कुटुंबाचा जबाब नोंदवला आहे. त्यांनी कोणावरही संशय व्यक्त केलेला नाही."


सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात त्याची कथित गर्लफ्रेण्ड रिया चक्रवर्तीवर पाटण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर बिहार पोलीस तपासासाठी मुंबईत दाखल झाले. त्यातच पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वॉरन्टाईन केल्याने तणाव वाढला आहे.


Sushant Singh Suicide | पाटण्याच्या एसपीना मुंबई महापालिकेने क्वॉरन्टाईन केलं


तपास योग्य दिशेने
बिहार पोलीस करत असलेल्या तपासावरुन मुंबई पोलीस आयुक्तांना विचारणा केली असता ते म्हणाले की, "बिहार पोलिसांनी आमच्याशी संपर्क केला होता, मात्र ते त्यांच्या कार्यक्षेत्रा बाहेर जाऊन चौकशी करत आहेत. याबाबत आम्ही कायदेशीर सल्ला घेत आहोत. बिहार पोलिसांना एफआयआरची नोंद करायला हवी होती. आम्हाला माहिती नाही कुठल्या कायद्यांतर्गत बिहार पोलीस एक्स्ट्रा टेरिटोरियल तपास करत आहेत. ज्याप्रकारे कायदेशीर सल्ला मिळेल त्यानुसार आम्ही पुढील कारवाई करु. त्यामुळे आम्ही अजून कुठलेही कागदपत्रे बिहार पोलिसांना दिलेले नाहीत. अजूनही तपासाचे सर्व अधिकार स्थानिक पोलिसांनाच आहेत. त्यांनी आम्हाला केस ट्रान्सफर करायला हवी होती. मात्र आमचा तपास योग्य दिशेने सुरु आहे."


क्वॉरन्टाईन असलेल्या विनय तिवारींवर भाष्य करणं टाळलं
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात चौकशी आलेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी यांना मुंबई महापालिकेने होम क्वॉरन्टाईन केलं. विनय तिवारी यांना क्वॉरन्टाईन करणं योग्य आहे का यावर थेट उत्तर देणं परमबीर सिंह यांनी टाळलं. ते म्हणाले की, "याबाबत मला काही माहिती नाही. ही कारवाई बीएमसीने केली आहे. मुंबईत बाहेरुन कोणी आलं तर त्याला नियमानुसार क्वॉरन्टाईन व्हावं लागतं हे तुम्हाला माहितच आहे ना."


कुटुंबाच्या जबाबात कोणावरही संशय नाही
16 जूनला फोन बहिणी आणि त्यांचे पती यांचा जबाब घेण्यात आला होता. त्यांच्या जबाबात कुठेच कोणावरही संशय घेण्यात आलेला नव्हता. त्यात सुशांत मानसिक आजारासाठी उपचार घेत असल्याचं स्पष्ट होत आहे. त्याच्या डॉक्टरांचे डॉक्युमेंटही मिळाले आहेत. नंतर आम्ही त्यांच्या बहिणींना चौकशीसाठी बोलावलं होतं, पण त्या आल्या नाहीत. कुटुंबियांनी एकदा जबाब नोंदवला, परंतु नंतर बोलावल्यावर ते आले नाहीत."


'दिशा सालियन मानसिक तणावात होती'
"सुशांतच्या आत्महत्येच्या आधी त्याची मॅनेजर दिशा सालियाननेही आत्महत्या केली होती. दिशा आधीपासून कोणत्या तरी तणावात होती. त्यांच्या दोन डीलमध्ये नुकसान झाले होते. तिच्या आत्महत्या प्रकरणाचाही तपास सुरु आहे," अशी माहितीही मुंबई पोलीस आयुक्तांनी दिली. ते पुढे म्हणाले की, "दिशा सालियनच्या आत्महत्येचा रिपोर्ट मालवणी पोलीस स्थानकात शताब्दी हॉस्पिटलमधून आला होती. आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे की दिशाच्या फियान्से रोह रॉयच्या घरी होत्या. त्यांच्यासोबत आणखी चार मित्र दीप अजमेर, इंद्रनील वैद्य, हिमांशू आणि दीपा पडवळ उपस्थित होते. तिथलं सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांचे शेजारी आणि परिवाराचा जबाब घेण्यात आला. त्यातून संशयास्पद मृत्यूची कोणीही शंका उपस्थित केलेली नाही. या पाच जणांना व्यतिरिक्त कोणीही त्या पार्टीत उपस्थित नव्हते."


फायनान्शियल एक्सपर्टच्या मदतीने आर्थिक गौरव्यवहार तपास
"सुशांतच्या सीएशी आम्ही विचारपूस केली. बँक स्टेट्समेंटची पडताळणी आम्ही करतोय. 17 करोड त्यांच्या बँकेत होते त्यापैकी अजूनही चार कोटी त्याच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये आहेत. इतर खर्चही करण्यात आले आहेत. मात्र रियाच्या अकाऊंटमध्ये पैसे ट्रान्सफर झाल्याचं आमच्या निदर्शनास अजून आलेलं नाही. तरी आमची टीम फायनान्शियल एक्सपर्टच्या मदतीने त्याचा तपास करत आहे," असं पोलीस आयुक्तांनी सांगितलं.


दरम्यान, "मॅनेजर दिशा सालियानच्या आत्महत्येशी संबंध जोडल्याने सुशांत सिंह तणावात होता. सोशल मीडियावर सुरु झालेल्या कॅम्पेनमुळे तो व्यथित होता.  बायपोलर डिसॉर्डर, स्किझोफ्रेनिया यांसारख्या आजारांबद्दल तो गुगलवर सातत्याने सर्च करत असल्याचे पुरावे सापडले आहेत." असं पोलीस आयुक्त म्हणाले.


संबंधित बातम्या


पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बॅंक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा