मुंबई : सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबईत दाखल झालेल्या बिहार पोलिसांना रोज नवनव्या प्रसंगांना सामोरं जावं लागत आहे. रविवारी (2 ऑगस्ट) दुपारी मुंबईत दाखल झालेले पाटण्याचे पोलीस अधीक्षक (शहर) बिनय तिवारी यांना मुंबई महानगरपालिकेने क्वॉरन्टाईन केलं आहे. गोरेगाव येथील एसआरपीएफच्या कॅम्पमध्ये असलेल्या गेस्टरुममध्ये त्यांना क्वॉरन्टाईन करण्यात आलं आहे. मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी रात्री अकराच्या सुमारास त्यांच्या हातावर स्टॅम्प मारुन त्यांना या बाबतच्या सूचना दिल्या आहेत. बिनय कुमार यांना 15 ऑगस्टपर्यंत क्वॉरन्टाईनमध्ये राहावं लागेल.


मात्र यावरुन मुंबई महापालिकेतील भाजपचे गटनेते विनोद मिश्रा यांनी नाराजी व्यक्त केली आहे. मुख्यमंत्री महापालिकेचा उपयोग या कामासाठी करीत असून याबाबत आयुक्तांना जाब विचारणार असल्याचे ते म्हणाले.






तर दुसरीकडे बिहारचे डीजीपी गुप्तेश्वर पांडे यांनी ट्वीट करुन म्हटलं आहे की, "आज (2 ऑगस्ट) आयपीएस बिनय तिवारी सरकारी ड्यूटीसाठी पाटणाहून मुंबईत दाखल झाले, पण रविवारी रात्री 11 वाजता मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी त्यांना जबरदस्तीने क्वॉरन्टाईन केलं. विनंती करुनही त्यांना आयपीएस मेसमधील निवासस्थान उपलब्ध करुन दिलं नाही. ते गोरेगांवमधील एका गेस्ट हाऊसमध्ये थांबले होते."





अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात दरदिवशी नवीन ट्विस्ट येत आहेत, नवीन खुलासे समोर येत आहेत. त्यातच मुंबई आणि बिहार पोलिसांच्या तसापावरुनही मतभेद निर्माण झाले आहेत. या प्रकरणात सातत्याने सीबीआय तपासाचीही मागणी होत आहे.


तत्पूर्वी मुंबई पोहोचल्यानंतर मीडियाशी बोलताना विनय तिवारी म्हणाले होते की, आमची टीम मुंबईत चांगलं काम करत आहे. मागील एक आठवड्यापासून जबाब नोंदवला जात आहे. जबाबांच्या विश्लेषणानंतरही अंतिम निर्णयापर्यंत पोहोचू. मात्र आम्हाला सुशात सिंह राजपूतचा शवविच्छेदन अहवाल अद्याप मिळालेला नाही.





तर पाटणाचे एसपी विनय तिवारी मुंबईत दाखल झाल्यानंतर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्वीट करुन म्हटलं की, बिहार पोलिसांनी पाटण्यात गुन्हा दाखल केला असला तरी या प्रकरणात मुंबई पोलिसांनी आधीच तपास सुरु केला आहे.


तर दुसरीकडे सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणात मुंबई पोलीस आयुक्तांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्यांनी या प्रकरणाशी संबंधित माहिती मुख्यमंत्र्यांना दिली होती. सोबतच बिहार पोलिसांची मुंबईतील उपस्थिती आणि सोशल मीडियावरील अफवांबाबतही माहिती दिली.


संबंधित बातम्या


पुजेसाठी सुशांतच्या खात्यातून लाखो रुपये खर्च; बॅंक खात्याच्या स्टेटमेंटमधून धक्कादायक खुलासा




सुशांतसिंह प्रकरणाचं राजकारण, तपास सीबीआयकडे देण्याची गरज नाही, मुंबई पोलिस सक्षम - अनिल देशमुख