भिवंडी : शहरातील गरजू नागरीकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आधारकार्ड पॅनकार्ड या कागदपत्रांची मागणी करत तसंच काहींना कागदपत्रांच्या मोबदल्यात पाच हजार रुपये अथवा सहा महिन्यांनी दुचाकी देण्याचे आमिष दाखवून कागदपत्र लुबाडणाऱ्यांना पोलिसांनी जेरबंद केलं आहे. संबधित टोळी या कागदपत्रांच्या मदतीने बँक अथवा फायनान्स कंपनीकडून कर्ज काढून दुचाकी विकत घेऊन त्या परस्पर विक्री देखील करत होती. भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने या सर्वांचा पर्दाफाश केला असून यामध्ये तब्बल 32 लाख रुपयांच्या दुचाकी जप्त करत चार जणांच्या टोळीला अटक करण्यात यश मिळवले आहे. अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी ही माहिती दिली.


भिवंडी शहरात सहा महिन्यां पूर्वी असद समद बेग याचे कागदपत्र असेच फसवणूक करून घेत त्या कागदपत्रांच्या मोबदल्यात दोन फायनान्स कंपनी मधून कर्जावर तीन दुचाकी काढल्याचे समोर आले होते. असदच्या इथे फायनान्स कंपनीचे प्रतिनिधी कर्जाच्या हप्त्यांच्या वसुलीसाठी आले असता हा प्रकार समोर आला. त्यानंतर निजामपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. ज्यानंतर भिवंडी गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शना खाली तपास कर शाह मोहम्मद आसिफ मोहम्मद आझम उर्फ बावटा यास ताब्यात घेत त्याची कसून चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने शहरातील वेगवेगळ्या शोरूम मधून कागदपत्रांच्या आधारे फसवणूक करत अनेक दुचाकी कमी किमतीत विक्री केल्याचे आढळले. त्याचे साथीदार अल्ताफ लतीफ शेख ,शफिक अब्दुल लतीफ अन्सारी ,अरबाज आसिफ मोमीन उर्फ देवा या चार जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत.


'नागरिकांनी कागदपत्रांची काळजी घ्यावी'


सर्व आरोपींकडून पोलिसांनी तब्बल 33 दुचाकी 6 मोबाईल असा एकूण 32 लाख 36 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल भिवंडी मालेगाव येथून जप्त केला आहे. नागरीकांनी आपली वैयक्तिक माहिती आधारकार्ड पॅनकार्ड केवायसी ही कागदपत्रे अनोळखी व्यक्तीस देऊ नयेत तर वाहन खरेदी करताना अधिकृत शोरूम मधून खरेदी करावे असे आवाहन गुन्हे विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त अशोक मोराळे यांनी केले आहे. 


महत्त्वाच्या बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha