ठाणे : भिवंडी शहर महानगरपालिका महापौर निवडणुकीत पक्षादेश झुगारून काँग्रेस विरोधी गटाला मतदान करणाऱ्या 18 नगरसेवकांचे पद रद्द करण्यासाठी कॉंग्रेसचे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्त यांच्याकडे लेखी तक्रार दिली होती. त्यांनतर अनेकवेळा यावर सुनावणी होऊन आज दोन वर्षांनी कोकण आयुक्तांनी त्या 18 नगरसेवकांच्या बाजूने निकाल देत, त्यांचे नगरसेवक पद कायम ठेवल्याची माहिती 18 नगरसवेकांचे गटाचे नेते तथा उपमहापौर इम्रानवली मोहंमद खान यांनी दिली. आज या नगरसवेकांच्या बाजूने निकाल लागल्याने महापालिकेने समोर फटाके फोडून जल्लोष साजरा केला.
काय घडलं होत?
भिवंडी पालिका सभागृहात काँग्रेसचे 47 सदस्य असल्याने काँग्रेस पक्षाचे पूर्ण बहुमत होते. मात्र 5 डिसेंबर 2019 रोजी झालेल्या महापौर पदाच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार रिषिका राका यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाच्या 18 नगरसेवकांनी बंडखोरी करीत विरोधी कोणार्क विकास आघाडीच्या प्रतिभा पाटील यांच्या बाजूने मतदान केले. या पक्षविरोधी भूमिकेमुळे माजी महापौर जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे 19 डिसेंबर रोजी पत्र देऊन बंडखोर 18 नगरसेवकांवर कारवाई करून त्यांना अपात्र ठरवावे अशी मागणी केली. या प्रकरणी 18 फेब्रुवारी व 16 मार्च रोजी सुनावणीच्या दोन फेऱ्या झाल्या आहेत. मात्र त्यानंतर 26 मार्च रोजी तिसरी सुनावणी देशभरात लॉकडाऊनमुळे रद्द करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुभाव कमी झाल्याने सर्व शासकीय कार्यालय सुरू झाले. त्यामुळे सदर प्रकरणी तात्काळ सुनावणी ठेवण्यात यावी अशी मागणी जावेद दळवी यांनी कोकण विभागीय आयुक्तांकडे लेखी निवेदनाद्वारे केली होती.
त्या 18 नगरसेवकांचा दोन महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीत प्रवेश
नगरसेवक पद वाचवण्यासाठी भिवंडी शहर महानगरपालिकेच्या 18 काँग्रेस बंडखोर नगरसेवकांनी दोन महिन्यापूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. त्यांनतर राष्ट्रवादीचे नेते तथा मंत्री जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादीत सामील झालेल्या त्या 18 नगरसेवकांचे पद वाचविण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली होती. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वी शोएब गुड्डू यांनी कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत दाखल होताच, त्यांच्याकडे राष्ट्रवादी जिल्हा अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
अखेर दोन वर्षाने या 18 नगरसेवकांचे पद कायम ठेवल्याच्या निर्णयामुळे कॉग्रेसला मोठा झटका लागल्याची चर्चा चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. तर 18 बंडखोर नगरसेवकांच्या बाजूने कोकण आयुक्तांनी दिलेल्या निर्णयाविरोधात काय हालचाली करणार हे येत्या काळात समोर येणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :