भिवंडी : तालुक्यातील वळपाडा पाईपलाईन पूर्णा गाव येथील सुवर्णा ऑईल, जय भगवान कॉम्प्लेक्समध्ये भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाने छापा मारून भेसळयुक्त डिझेलसाठी लागणारे ज्वलनशील पदार्थ जप्त करत चार जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यावेळी भेसळयुक्त रॉकेल आणि डिझेल बनवणाऱ्यांचा पर्दाफाश करत छापेमारीत 83 लाखांचा मुद्देमाल जप्त केलं आहे. यामध्ये जी.पी.थिनर, एम.टी.ओ मिक्स ॲरोमॅटिक आणि हॅक्झेन असे ज्वलनशील पदार्थ आहेत. या ज्वलनशील पदार्थांचा वापर करून या ठिकाणी भेसळयुक्त रॉकेल आणि डिझेल तयार करण्यात येत होते. दिनेश कुमार जैस्वाल, असे अटक केलेल्या एका डिझेल माफियाचे नाव आहे. तर दिलीपचंद दुबे, दीपक ठक्कर, राजेश ठक्कर अशी फरार असलेल्या माफियांची नावे आहेत. 


भिवंडी गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, एका टँकरमध्ये भेसळयुक्त डिझेलची वाहतूक होणार होती. त्या माहितीच्या आधारे सापळा रचून पोलिसांनी चालकाला टँकरसह पकडले, त्यामुळे हा भेसळयुक्त डिझेलचा गोरख धंदा समोर आला. गुन्हा दाखल झालेल्या चारही माफीयांनी संगनमत करून कोणताही कायदेशीर परवाना नसताना इलेक्ट्रिक मोटारच्या सहाय्याने ज्वलनशील पदार्थ टँकरमध्ये भरून त्यामध्ये भेसळ करून केरोसीन आणि डिझेल सदृष्य पदार्थ तयार करीत होते. लाखो लिटर भेसळयुक्त केरोसीन आणि डिझेल बाजारात विक्रीसाठी आणले जात होते. तसेच अनेक पेट्रोल पंपावर या भेसळयुक्त डिझेलची विक्री केल्याचा कयास पोलिसांनी व्यक्त केला आहे.  छापेमारीत 60 लाख 45 हजार 200 रुपये आणि 22 लाख 58 हजार 331 रुपये असा एकूण 83 लाख 3 हजार 531 रुपयांचा अवैध भेसळयुक्त डिझेलचा साठा केला होता. भेसळयुक्त डिझेल माफियांवर कलम 420, 120ब 34 सह 1955 चे कलम 3,7,10 तसेच विविध पेट्रोलियम कलमान्वये पोलिसांनी गुन्हे दाखल करून मुद्देमाल साठा जप्त केला आहे. हे रॅकेट मोठे असण्याची दाट शक्यता पोलिसांनी व्यक्त केली असून भेसळयुक्त डिझेल बनवण्याचं काम पेट्रोल पंपावर करण्यात येत होतं का? किंवा कोण कोणत्या पेट्रोल पंपावर त्याची विक्री करण्यात आली? या गुन्ह्यात आणखी कोणाकोणाचा हात आहे? या संपूर्ण गोष्टीचा तपास सध्या भिवंडी गुन्हे शाखा करीत आहे.


इतर महत्त्वाच्या बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha