ठाणे : शहरातील फातमा नगर येथे राहत्या घराच्या खोलीत गांजा साठविल्याची माहिती भिवंडी गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली. सदर ठिकाणी शुक्रवारी पोलिसांनी छापा टाकला असता तब्बल 16 लाख 37 हजार 480 रुपये किंमतीचा 75 किलो गांजा गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला. अवैध गांजा साठवणूक केल्या प्रकरणी एकास अटक केली असल्याची माहिती गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे.
कमल हसन रजा उर्फ गुड्डू अन्सारी (वय 24 वर्षे) रा. फातमा नगर असे गांजा साठवणूक प्रकरणी अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने फातमा नगर येथे तो राहत असलेल्या घरातील खोलीत अवैध गांजा साठवला असल्याची खबर भिवंडी गुन्हे शाखा युनिट-2 यांना मिळाली. गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने फातमा नगर, मैदानाच्या बाजूला छापा मारून कमल याचे राहत्या घरातून एकुण वजन 74.624 किग्रॅ वजनाचा मानवी शरीरावर परिणाम करणारा गांजा हा अंमली पदार्थ, रोख रक्कम व मोबाईल फोन असा एकूण 16 लाख 37 हजार 480 रुपयांचा मुद्देमाल गुन्हे शाखेच्या पोलिसांनी जप्त केला आहे.
सदरचा मुद्देमाल हा पंचनामा करून जप्त करण्यात आला असून या प्रकरणी स्थानिक शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीस शनिवारी न्यायालयासमोर हजर केले असता त्यास 22 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गांजा मिळाले असल्याने यामध्ये अजून कोणी सहभागी आहे का? कुठे सप्लाय होणार होता याबाबत पोलिस तपास करीत आहेत.
संबंधित बातम्या :